हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथे विठ्ठल बिरदेव देवालयाजवळील परिसरात गव्याचे दर्शन झाले. बाळू कापसे या शेतकऱ्याला अचानक गवा दिसल्याने तारांबळ उडाली. गव्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली. भयभीत अवस्थेत गव्याने सरावैरा पळण्यास सुरुवात केली तर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी गव्याला पाहून आरडाओरड सुरू केली.
जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील निलेवाडी रस्त्यावर वारणा नदीकाठी गावातील शेतकऱ्यांची उसाची शेती आहे. शेतातच अनेकांच्या जनावरांचे गोठे आहेत, त्यामुळे शेतातील कामाबरोबर जनावरांचे दूध काढण्यासाठी शेतकरी सकाळी लवकर शेतात जातात. बाळू कापसे हे नेहमीप्रमाणे शेतात जनावरांचे दूध काढण्यासाठी आले असता पाठीमागून कसला तरी आवाज आल्याने मागे वळून पाहताच त्याना भलामोठा गवा नजरेस आला. भयभीत झालेल्या कापसे यांनी आरडाओरड केला. याचवेळी शेजारचे शेतकरी राजाराम पाटील, पत्नी व मुलगा वैभव यांनी सदरचा गवा मोकळ्या रानातून धावत येत असल्याचे पाहिले. नंतर तो गवा दिलीप पाटील यांच्या ऊस आणि गव्हाच्या शेतातून पुढे पाराशर विकास सेवा सोसायटीच्या उसाच्या शेतात घुसला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागप्रमुख संपत पोवार व पोलीसपाटील इंद्रजित शहाजीराव पाटील यांनी गवा गावात आल्याची वार्ता वडगाव पोलीस ठाण्यास व वनविभागाला त्वरित दिली. वडगावचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, के बी पाटील यांच्यासह वनक्षेत्रपाल विश्वजित जाधव, वनपाल श्रीपती कल्याणकर, वनरक्षक रशिद गारदी, वनसेवक भगवान भंडारी यांच्यासह आठ ते दहा जणांच्या पथकाने आसपासच्या ऊसशेतीत गव्याचा कसोशीने शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत शोध घेणे सुरू होते. या गव्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.