कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या आहे, अशी टीका शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी, समन्वयक हर्षल सुर्वे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

मोदी म्हणाले, मंडलिक व माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा निवडणूकीत प्रचंड मतांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयात मंडलिक, माने गटाव्यतिरिक्त शिवसेना व प्रस्थापितांच्या विरोधात लढणाऱ्या अनेक व्यक्तींनी हातभार लावला होता. या दोघांनी शिंदे गटाकडे जाताना केवळ त्यांच्या गटातील लोकांचा विचार विनिमय केला ही बाब निषेधार्थ आहे. मदत करणाऱ्या सर्व घटकांची चर्चा केली असती तर त्यांचा प्रामाणिकपणा मतदारांच्या पुढे आला असता. ही बाब निष्ठावंत शिवसैनिकांना कधीही पसंत पडणारी नाही. आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली शिवसेना अधिक बळकट होईल. पुढील लोकसभा निवडणूक ताकतीने लढवून जिंकून दाखवू असे शिवसेनेच्या प्रामाणिक कार्यकर्ते व मतदारांचे मत आहे.

पदाचा राजीनामा

खासदार मंडलिक यांच्या कोट्यातून माझी पुणे रेल्वे बोर्डावर नियुक्ती करण्यात आली होती.ते शिंदे गटात गेल्यामुळे या निर्णयाचा निषेध म्हणून मी या रेल्वे मंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.