कोल्हापूर : विश्वाच्या कल्याणासाठी संतांचे विचार, आचार, साहित्य सर्वासमोर यावे. संत साहित्य संमेलनातून विश्वकल्याणाचा विचार सर्वदूर पोहोचेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी येथे केले. येथे आयोजित पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यपाल कोश्यारी म्हणाले, सारे विश्व हे आपले घर असल्याची शिकवण संतांनी दिली आहे. आज मात्र आपण या शिकवणीपासून दूर जाऊन नात्या-नात्यात गुंतलो आहोत. सुखी जीवनासाठी संत साहित्याचे मनन, चिंतन करून त्यांचे आचार-विचार प्रत्येकाने आचरणात आणावेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत तुलसीदास, गौतम बुद्ध, गुरु गोविंदसिंग यांच्यासह सर्व धर्मातील संतांनी त्यांच्या साहित्यातून विश्व कल्याणाची शिकवण दिली आहे. संत साहित्याचा देश-विदेशात प्रचार होणे गरजेचे आहे.

 संमेलनाध्यक्ष ह.भ.प. न्या. डॉ. मदनमहाराज गोसावी म्हणाले, मानवाच्या कल्याणाचे सूत्र संत साहित्यात आहे. मानवामध्ये विश्वबंधुत्वाचा धागा आहे. करोनाच्या संकट काळात एकमेकाला मदत करण्याची भूमिका यामुळेच दिसून आली. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणाले, विश्वाला शिकवण देण्याची ताकद संत साहित्यात आहे. संतांनी आपल्या साहित्यातून भूतदया हा मंत्र जगासमोर आणला. तत्पूर्वी सकाळी टाळ-मृदंग व हरिनामाच्या गजरात ग्रंथिदडी काढण्यात आली. त्याचे उद्घाटन लोक साहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथ दालनाचे उद्घाटन डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते तर चित्रदालनाचे उद्घाटन डॉ. सुहास बहुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी देश-विदेशातील संत साहित्यिकांशी संवाद साधला.