शरद पवार यांच्या हस्ते माजी आ. व्यंकाप्पा पत्की यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरणाचा कार्यक्रम हा दिशाभूल करून सर्वोदय साखर कारखाना हडपण्याचा डाव असल्याचा आरोप माजी आ. संभाजी पवार यांनी पत्रकार बठकीत केला. कारखान्यावर कब्जा मिळविण्यासाठीच माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचेही ते म्हणाले.
सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी आ. व्यंकाप्पा पत्की यांच्या स्मारकाचे कारंदवाडी येथे स्मारक उभारण्यात येत असून हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मंगळवार दि. २४ नोव्हेंबर रोजी होत आहे. या कार्यक्रमाबाबत कारखान्याचे अधिकृत संचालक मंडळ व अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यासह संचालक मंडळाला अंधारात ठेवण्यात आले.
कारखान्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही भाडेतत्त्वावर कारखाना चालविण्यास घेणाऱ्या राजारामबापू साखर कारखान्यास असे स्मारक उभारण्याचा अधिकारच पोहोचत नाही. सर्वोदयचे सभासद हे काम करण्यास समर्थ आहेत. मात्र आ. पाटील यांना हा कारखाना बळकावयचा आहे. यामुळेच असले उद्योग ते करीत आहेत. कारखान्याचा संस्थापक मीही असून या कृत्याचा मी निषेध करीत असल्याचेही पवार यांनी या वेळी सांगितले.
आ. पाटील यांनी यापूर्वी जत, आरग हे कारखाने हडप केले असून सर्वोदय हडप करण्याचा त्यांचा प्रयत्न असून यापुढील लक्ष्य वसंतदादा कारखाना आहे. त्या दिशेनेच त्यांची व्यूहरचना सुरू असल्याचा आरोपही या वेळी श्री. पवार यांनी केला.