राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार राज्यसभेचे ज्येष्ठ खासदार व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमित सनी यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

हा पुरस्कार राजर्षी शाहू जयंतिदिनी म्हणजे रविवार, २६ जून रोजी शाहू स्मारक भवन येथे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात येणार आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सामाजिक न्याय, समता, कृषी, औद्योगिक क्षेत्र, क्रीडा, साहित्य व कला अशा अनेक क्षेत्रांतील राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतिशील वारसा चालू ठेवणारे एक ज्येष्ठ व्यक्तित्व म्हणून आणि त्यांनी राज्याच्या व भारताच्या विकासात्मक वाटचालीमध्ये दीर्घकाळ केलेल्या मौलिक योगदानाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार शरद पवार यांना देण्याचा निर्णय ट्रस्टच्या विश्वस्तांच्या बठकीमध्ये घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. १९८४ पासून आजपर्यंत ३० जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. पत्रकार परिषदेला ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, डॉ. प्राध्यापक अशोक चौसाळकर, प्रशासन अधिकारी डॉ. विवेक आगवणे आदी उपस्थित होते.