शिरोळ येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोडा घालून सुमारे २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना जेरबंद करण्यात पोलिसाना यश आले आहे. चंद्रसिंग उर्फ लाला नरसिंग खुर्दे (वय ३९ रा. नायगाव,जि. बुलढाणा) व संतोष हरी कदम (रा.३७ रा.घाटणे सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून १२ लाख रुपये किमतीची आलिशान कार पोलिसांनी जप्त केली आहे.
अटक आरोपींना न्यायालयाने ७ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने कर्नाटक राज्यातील बदामी येथील बँक लुटून सोने व रोख रक्कम अशी साडेचार कोटींची रक्कम लंपास केल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा बँकेच्या शिरोळ शाखेत डिसेंबर २०१८ मध्ये अज्ञात चोरट्यांनी बँकेत प्रवेश करून सभासदांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची तिजोरीचा दरवाजा तोडून त्यातील सुमारे २५ लाख ५६ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते.
दरम्यान फेब्रुवारी महिन्यात कळे (ता. गगन बावडा) येथील यशवंत बँकमध्ये अशाच प्रकारचा दरोडा टाकून ७२ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या दरोड्याच्या तपासा दरम्यान दोघांना अटक केली होती. शिरोळ येथील बँक चोरी प्रकरणात गॅसचा वापर झालेल्या ऑक्सिजन सिलिंडर मध्ये साम्यता असलेने सदरची ऑक्सिजन सिलिंडर ही कोणत्या एजन्सीची आहेत याबाबत माहिती घेतली असता टेंभुर्णी येथील “सागर गॅस एजन्सी” कडील सिलिंडर असलेची माहिती प्राप्त झाली. हाच संशयाचा धागा पकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे व सहकाऱ्यांनी बुलढाणा येथे जावून आरोपी चंद्रसिंग उर्फ लाला खुर्देला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता शिरोळ येथील बँक चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.