कोल्हापूर : हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक उद्धव ठाकरे शिवसेना पक्षावर प्रेम करणारा आहे. तो अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाही. ते पक्षाशी व ठाकरे घराण्याची एकनिष्ठ राहतील, असा विश्वास उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी व्यक्त केला. पक्षाच्या वतीने हातकणंगले येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, माजी पं. स. सदस्य पिंटू मुरूमकर, गणेश भांबे, शरद पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चौगुले म्हणाले, की मतदारसंघातील ठाकरे गटाचे शिवसैनिक, पदाधिकारी हे माजी आमदारांसोबत शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असली, तरी त्यात तथ्य नाही. शिवसैनिक पक्षाशी एकनिष्ठ राहून ठाकरे गट अभेद्य ठेवतील. ते रस्त्यावरची लढाई लढत राहतील. जिल्ह्यात अनेकदा राजकीय घडामोडी घडल्या; परंतु मातोश्रीवरून आलेल्या आदेशानुसार शिवसैनिक काम करत राहिला आहे. इथून पुढे तसेच काम करत राहतील. शिवसेनेत कोण आले, कोण गेले यापेक्षा शिवसेनावाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.