कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावर पर्यायी पुलाची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : कोकण — घाटमाथा जोडणाऱ्या पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाचे काम करण्याच्या कामाच्या आंदोलनात आता शिवसेनेनेही उडी घेतली आहे . जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिलेल्या ग्वाहीप्रमाणे पंधरा दिवसात  सुरू करावे, अन्यथा २८ मे रोजी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी  जिल्हा प्रशासनास दिला आहे . पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाचे काम रखडले असल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचा प्रकार होत आहे . त्यामुळे सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन करण्याचा इशारा  जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी अविनाश सुभेदार यांना  दिला होता . दरम्यान , आज  पर्यायी पुलाच्या कामाबाबत क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी सुभेदार यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. या कामामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत  सुभेदार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलनाचा इशारा दिला .

क्षीरसागर यांनी सांगितले की, शिवाजी पुलाला पर्यायी पूल म्हणून बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून पुरातत्त्व विभागाच्या कायद्यामुळे थांबले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी ३० जानेवारी रोजीच्या पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. परंतु, सुमारे साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी प्रशासन गप्प आहे. जानेवारी महिन्यात जुन्या पुलावरून प्रवासी बस कोसळून दुर्दैवी घटना घडली होती, पण या घटनेचे थोडेफार गांभीर्यही प्रशासनाने घेतलेले नाही. आजही या जुन्या पुलावर अपघात घडत आहेत. त्यामुळे प्रशासन पुन्हा मोठी दुर्घटना घडून निष्पाप बळी जाण्याची वाट बघत आहे का,  असा सवाल  क्षीरसागर यांनी उपस्थित केला.

दोन आठवडय़ात पर्यायी पुलाचा प्रश्न मार्गी — सुभेदार

यावर  सुभेदार यांनी, केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडेही याबाबत पत्रव्यवहार सुरू असून यापूर्वी दिलेल्या पत्रात दुरुस्ती करून बुधवारी नव्याने या विभागाला पत्र दिल्याचे सांगत, पुरातत्त्व विभागाला पुलाच्या बांधकामासाठी १५ दिवसांत नाहरकत पत्र द्यावे अन्यथा  परवानगी आहे, असे समजून काम सुरू करू, असे सुधारित पत्र दिल्याचे सांगितले. पर्यायी पुलाच्या प्रश्नाचे गांभीर्य मोठे असून पुरातत्त्व विभागाकडून पुलाच्या बांधकामाला कोणतीही अडचण येईल असे वाटत नसल्याचे सांगितले. प्रशासन येत्या दोन आठवडय़ात या पर्यायी पुलाचा प्रश्न मार्गी काढेल, अशी ग्वाहीही दिली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena agitation in kolhapur for bridge on panchganga
First published on: 12-05-2018 at 04:02 IST