५७ क्विंटल धान्य, तीन ट्रक चाऱ्याचे वितरण
शिवाजी विद्यापीठाने आपल्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती देताना विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि त्यांच्या जनावरांसाठी सुमारे ५७ क्विंटल धान्य आणि तीन ट्रक चाऱ्याचे वितरण केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी प्रशासकीय सहकाऱ्यांसह सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त आटपाडी आणि जत तालुक्यांची पाहणी करण्याबरोबरच चार गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मदतीचे वाटप केले.
यंदा दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यापीठाने विद्यार्थी कल्याण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून संलग्नित महाविद्यालयांना मदतीसाठी आवाहन केले होते. तसेच, विद्यापीठ परिसरातही गवत व चारा संकलन केले होते. या माध्यमातून गहू, तांदूळ इत्यादी सुमारे ५७ क्विंटल धान्य गोळा झाले. तसेच सुमारे तीन ट्रक चाराही जमा झाला. या सर्व मदतीचे चार गावांमध्ये वाटप करण्यात आले.
तडवळे (ता. आटपाडी) येथील ४५० कुटुंबांना सुमारे २२ क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले. माडगुळे (ता. आटपाडी) येथील १०० कुटुंबे आणि त्यांची जनावरे यांच्यासाठी १० क्विंटल धान्य व १० क्विंटल सरकी पेंड देण्यात आली. वज्रवाड (ता. जत) येथील १०० कुटुंबे व त्यांच्या जनावरांसाठी १० क्विंटल धान्य व २ ट्रक चारा-गवत देण्यात आले. खिलारवाडी (ता. जत) येथील ५० कुटुंबे व त्यांच्या जनावरांसाठी ५ क्विंटल धान्यासह १ ट्रक चारा देण्यात आला.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. एस. आर. कारंडे, प्राचार्य डॉ. बी. एन. पवार, राष्ट्रीय सेवा योजना सांगली जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. सदाशिव मोरे, राजे रामराव महाविद्यालय, जत येथील कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र लवटे, डॉ. संगीता पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivaji university help to drought suffers
First published on: 03-05-2016 at 02:45 IST