ज्येष्ठ कामगार नेते गोिवद पानसरे हत्याप्रकरणाचा खटला न्यायप्रविष्ट असताना याबाबत सनातनच्या नियतकालिकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी वकिलांच्या निदर्शनास आणून देत त्यांनी सनातनला कारणे दाखवा नोटीस बजावली. पानसरे हत्याप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे याला पोलिसांनी सुनावणीस हजर न केल्याने तपास यंत्रणांना बिले यांनी खडसावले. तसेच पुढील सुनावणीस तावडेला न्यायालयात हजर करण्याचे आदेश त्यांनी दिले. या खटल्याची पुढील सुनावणी सोमवार (६ फेब्रुवारी) रोजी होणार आहे. पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडला कळंबा कारागृहात सनातनचे अंक मिळावेत अशी मागणी समीरचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी न्यायालयात केली होती. सनातनचे अंक देण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. यानुसार समीरला कळंबा कारागृहात सनातनचे अंक पाठवण्यात येत होते. मात्र हे अंक कारागृहातून परत आल्याची तक्रार अॅड. समीर पटवर्धन यांनी न्यायालयात करत परत आलेले अंक न्यायालयात सादर केले. हे अंक वाचत असताना यामध्ये खटल्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्याचे बिले यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब समीर पटवर्धन यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजी राणे यांना हा अंक वाचण्यास दिला. निरपराध िहदुत्ववाद्यांना जेलमध्ये २ वर्षे डांबून ठेवले जाते. त्यांचा छळ केला जातो. असा छळ करणाऱ्यांना िहदुराष्ट्रात दुप्पट शिक्षा केली जाईल, असा मजकूर सनातनच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आला होता. या मजकुरावर न्यायालयानेच आक्षेप घेत सनातनला नोटीस बजावली. या बाबत अॅड. समीर पटवर्धन यांनी प्रसिद्ध झालेल्या मजकुराबाबत न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली. तावडे हा पानसरे हत्येमधील दुसरा संशयित आरोपी आहे. त्याच्यावर वॉरंट आहे. तो जगाच्या कोणत्याही जेलमध्ये असल्यास त्याला या न्यायालयात सुनावणीस हजर करण्यात यावे असे सुनावत बिले यांनी पुढील सुनावणीस कोणत्याही परिस्थितीत तावडेला हजर करण्याचे आदेश तपास यंत्रणांना दिले. हजर करण्याची सर्व जबाबदारी तपास अधिकारी व तपास यंत्रणेची असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2017 रोजी प्रकाशित
आक्षेपार्ह मजकुराच्या प्रसिद्धीबद्दल सनातनला कारणे दाखवा नोटीस
सनातनचे अंक देण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-01-2017 at 01:21 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Show cause notice to sanatan