कोल्हापूर : ढगाचा अडथळा नसलेने श्री महालक्ष्मी मंदिरात सूर्य किरणांनी ५ वाजून ४२ मिनिटांनी देवीच्या चरणस्पर्श करून हळूहळू पावणे सहा वाजता मिनिटांनी गुडघ्यापर्यंत पोहोचली. ती ५ वाजून ४७ मिनिटांनी देवीच्या डाव्या कानापर्यंत पोहोचून हळूहळू लुप्त झाली. त्यानंतर मंदिरामध्ये देवीची आरती होऊन हा सोहळा पार पडला.

महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामधील एक शक्तीपीठ आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवास ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला असून तो ११ नोव्हेंबरपर्यंत चालेल. महालक्ष्मीदेवी मंदिरात होणारा किरणोत्सव हा वर्षातून २ वेळा म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन यांमध्ये होतो. उत्तरायणात तो ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारीला, तर दक्षिणायनात तो ९, १० आणि ११ नोव्हेंबरला होतो. सोहळ्याच्या वेळी मावळतीचे सूर्यकिरण महाद्वारातून मंदिरात प्रवेश करून प्रथम दिवशी देवीचे चरण, दुसर्‍या दिवशी पोट आणि तिसर्‍या दिवशी मुख अन् तदनंतर संपूर्ण मूर्ती यांना स्पर्श करतात.

मंदिराची स्थापत्य रचना इतकी अभ्यासपूर्ण केली आहे की त्यामध्ये पृथ्वीच्या परिवलनाचा अभ्यास देखील करण्यात आला आहे. म्हणजे उत्तरायणामध्ये मावळणारा सूर्य दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये मंदिराच्या समोर कोणत्या स्थानी असेल हे पाहून मंदिर स्थापत्याची रचना केली आहे. तसेच दक्षिणायनामध्येदेखील सूर्य त्याच ठिकाणी कोणत्या दिवशी कोणत्या वेळी येतो हे देखील पाहण्यात आले आहे.

सूर्यकिरणे लक्स या परिमाणात मोजतात. किरणोत्सवातील सूर्यकिरणांची क्षमता मोजल्यानंतर असे लक्षात आले की मंदिर बांधताना सूर्यकिरणांची क्षमता कोणत्या प्रहरी किती असते हे देखील अभ्यासले आहे. त्यामुळे शतकानुशतके दक्षिणायन आणि उत्तरायन या काळामध्ये सूर्यकिरणे महाद्वारातून येऊन देवीच्या मूर्तीवर पडतात.

नोव्हेंबर महिन्यामध्ये तसेच जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीत पहिल्या आठवड्यात, असा वर्षातून दोन वेळा हा सोहळा होतो. काळाच्या ओघात मंदिराच्या महाद्वारासमोर काही बांधकामे झाली. त्यामुळे सूर्यकिरणांना अडथळा निर्माण झाला. पण महापालिकेने किरणोत्सवात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तात्कालिक का होईना पण उपायोजना केल्या आहेत. त्यामुळे किरणोत्सवातील अडथळे काही प्रमाणात दूर झाले आहेत.

एरवी मंदिराची भव्यता कोरीव काम आणि स्थापत्य पाहिले की अश्रद्ध मनातही अद्भुत अशा भावना प्रकट होतात. किरणोत्सवामध्ये सूर्यकिरणांचा सोनेरी प्रवास भोवताली दाटलेल्या नकारात्मकतेच्या तिमिरातून चैतन्याने भरलेल्या आपल्याच अंत:करणातील तेजाचे दर्शन घडवतो.