केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची सूत्रे स्मृती इराणी यांच्याकडे सोपवण्याचा निर्णयाचे वस्त्रोद्योग क्षेत्रातून संमिश्र स्वागत होत आहे. तरुण, तडफदार असलेल्या इराणी यांनी मरगळलेल्या वस्त्रोद्योगात ऊर्जा निर्माण करून तडफदारी सिद्ध करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याचवेळी शिक्षण विभागासारखा घोळ न घालता वस्त्रोद्योगाची विस्कटली घडी नीट करण्याच्या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहिले जात आहे. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीकडे लक्ष ठेवून त्यांची ही निवड केली असली, तरी त्यामध्ये गुंतण्याऐवजी मंदीच्या जबर तडाख्यात सापडलेल्या वस्त्रोद्योगाचे धागे–दोरे अधिक मजबूत होण्याला प्राधान्य द्यावे, अशी सार्थ अपेक्षाही इराणी यांच्याकडून केली जात आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले. वस्त्रोद्योग खात्याची धुरा त्यांनी इराणी यांच्याकडे सोपवली. यापूर्वी ही जबाबदारी संतोष गंगेवार यांच्याकडे होती. ते वस्त्रोद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री असले तरी त्यांच्याकडे स्वतंत्र पदभार होता. दोन वर्षांच्या कालावधीत गंगेवार यांची कामगिरी मुळीच संतोषजनक नव्हती. शेती खालोखाल सर्वात मोठा आणि रोजगाराची मुबलक संधी असलेल्या वस्त्रोद्योग मंत्रालयाशी गंगेवार यांचा धागा कधीच जुळला नव्हता. उलट, बाराव्या पंचवार्षकि नियोजनात गृहीत धरलेले वस्त्रोद्योग आधुनिकीकरणाचे अनुदान त्यांनी ३० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणल्याने खुद्द भाजपातील वस्त्रउद्योजक उघडपणे नाराजी व्यक्त करीत होते. वस्त्रोद्योग निर्यातीचा टक्काही खालावला असताना गंगेवार यांनी कोणतीही धाडसी पावले टाकली नसल्याने त्यांच्याकडून होणाऱ्या अपेक्षांवर पाणी फिरले.
या पाश्र्वभूमीवर वस्त्रोद्योग विभाग इराणी यांच्याकडे मोठय़ा अपेक्षेने पाहत आहे. कंफेडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाईल – सिटी, तिरूपूर एक्सपोर्टर्स असोसिएशन – टी या राष्ट्रीय पातळीवरील वस्त्रउद्योजक संघटनांनी इराणी यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांनी वस्त्रोद्योगाला चालना देऊन निर्यात स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, देशभर वस्त्रोद्योगात कमालीची मंदी आहे. सूतगिरण्यांना रोज लाखाचा तोटा होत असताना साखर निर्यात अनुदान धर्तीवर सूत निर्यातीस भरीव अनुदानाचा निर्णय त्यांनी घ्यावा. योग्य निर्णय घेऊन त्या वस्त्रोद्योगास अच्छे दिन आणतील ,असा विश्वास वाटतो. पॉवरलूम एक्सपोर्ट अँड प्रमोशन काउंसिलचे संचालक सुनील पाटील यांनी गुंतागुंतीच्या वस्त्रोद्योगाला हाताळण्यात अनुनभवी इराणी किती यशस्वी ठरणार याविषयी संशय व्यक्त करून केवळ बडय़ा उद्योगाकडे लक्ष देण्याऐवजी विकेंद्रित वस्त्रोद्योग सर्वात मोठा असून तो मोडकळीस आल्याने त्याकडे त्यांनी तातडीने पाहण्याची गरज व्यक्त केली.