महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर चर्चा

माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील एक बलाढय़ व्यक्तिमत्त्व भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे ही राजकीय व्यक्ती कोण यावरून चर्चेला उधाण आले असून त्यावरून ‘पतंग’बाजीला वेग आला आहे.

लोकसभा ते जिल्हा परिषद निवडणूक असा सुमारे तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला तरी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या काही कमी व्हायला तयार नाही. सत्तावलयात राहण्याची सवय लागलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांना सत्तावर्तुळ खुणावत असल्याने तसेच चौकशीचा ससेमिरा चुकावा या हेतूने सध्या प्रवेशाची ही रांग काही थांबायचे नाव घेत नाही. या पाश्र्वभूमीवर पाटील यांनी लवकरच एक मोठा नेता भाजपवासीय होणार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे.

राज्यमंत्रिमंडळातील द्वितीय स्थानी असलेल्या ‘दादा’ मंत्र्याने हे विधान केले म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या न गेल्या तर नवल. लगोलग या राजकीय नेत्यांबद्दल चर्चेलाही उधाण आले आहे. यामध्ये ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व श्रीमंत शाहू महाराज, माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे यांच्यापासून ते काँग्रेसमधील एक मातब्बर नेता आणि एका मोठय़ा शिक्षण संस्थेच्या कुलपतीपर्यंत अनेक नावांची ‘पतंग’बाजी सुरू झाली आहे.