यंत्रमागधारकांकडून उत्पादनात घट; कापड खरेदी ठप्प

वस्तू-सेवाकर लागू झाल्यानंतर वाढलेले कर आणि या करआकारणीतील जाचक अटी यामुळे राज्याचे ‘मँचेस्टर’ म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योगापुढे गंभीर संकट उभे ठाकले आहे. शहरातील कापड उत्पादक यंत्रमागधारकांनी उत्पादन घटवले आहे, तर दुसरीकडे उत्पादित कापडाची खरेदी पाच दिवस बंद करण्याचा निर्णय कापड व्यापाऱ्यांनी घेतला आहे. यामुळे दररोजची १५० कोटी रुपयांची कापडखरेदी ठप्प झाली आहे. त्याचवेळी, आíथक क्षेत्रातील जाणकार मात्र, करचुकवेगिरी करण्यासाठी कापड व्यापारी वस्तू-सेवाकराविरोधात भूमिका घेत असल्याचा आक्षेप खासगीत नोंदवत आहेत.

वस्तू-सेवाकर लागू होण्याआधीच वस्त्रोद्योगातून या करआकारणीला विरोध केला जात होता. कर आकारणीचे स्वरूप स्पष्ट झाल्यावर तर याविरोधात देशव्यापी तीव्र विरोध व्यक्त झाला. इचलकरंजीतही तेच चित्र आहे. शहरातील व्यापाऱ्यांसह यंत्रमागधारक व वस्त्रोद्योगातील सर्वच घटकांत कमालीची संभ्रमावस्था आहे. सुती कापडासाठी पाच टक्के आणि कृत्रिम धाग्यासाठी १८ टक्के अशी करांतील तफावत आहे. त्या खेरीज ‘जॉब वर्क’साठी ५ टक्के कर आकारला जात आहे. कर भरल्यानंतर प्रत्येक महिन्याला विवरणपत्रे भरणे, ‘ई-वे बिल’ अशा क्लिष्ट प्रक्रियेलाही सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या करप्रणालीतील गुंतागुंत दूर करून त्यात सुलभता आणावी, अशी मागणी करत ‘इचलकरंजी पॉवरलूम क्लॉथ अँड यार्न र्मचट्स असोसिएशन’ने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता.

या परिस्थितीत कापड व्यापारी, अडत व्यापारी, ब्लिच कापड व्यापारी, शूटिंग-शìटग व्यापारी यांनी कापडखरेदी थांबविली आहे. वस्त्रोद्योग हा एका छताखालचा उद्योग नाही. अनेक टप्प्यांवर त्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. या प्रत्येक टप्प्यावर वस्तू-सेवाकराची किचकट कागदपत्रे पूर्ण करणे अपरिहार्य ठरणार आहे. यामध्ये एखादी जरी चूक झाली तरी त्याचा भरुदड बसण्याची भीती सर्वच घटकांना वाटते आहे. ‘या सगळ्याच गोष्टींमुळे यंत्रमागावरील कापड उत्पादन निम्याहून अधिक प्रमाणात घटले आहे. त्यामुळे येथील २५ हजारांहून अधिक यंत्रमागधारकांसमोर आíथक संकट  उभे राहिले आहे’, असे ‘इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन’चे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी सांगितले.

.. तर बेमुदत बंद : ‘वस्तू-सेवाकरप्रणाली विरोधात प्रारंभी पाच दिवस खरेदी बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील वस्त्रोद्योगात आंदोलन होत असून शासन व्यापाराला अनुकूल निर्णय घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे योग्य निर्णय झाल्यास आंदोलन थांबवण्यात येईल, अन्यथा बेमुदत कापड खरेदीचे टोकाचे आंदोलन करावे लागेल’, असे इचलकरंजी पॉवरलूम क्लॉथ अँड यार्न र्मचट्स असोसिएशनने अध्यक्ष उगमचंद गांधी यांनी सांगितले.

कोटय़वधींची उलाढाल थंडावली

  • इचलकरंजीत साधे यंत्रमाग सव्वा लाख, अर्धस्वयंचलित २५ हजार, तर अत्याधुनिक शटललेस माग दहा हजारांवर आहेत.
  • दररोज सुमारे ७० ते ८० लाख मीटर कापडाचे उत्पादन त्यातून होते. त्याची विक्री २० ते १०० रुपये मीटर प्रमाणे होते. हा सर्व हिशोब विचारात घेता रोजची दीडशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.