यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठी एफआरपीचे तुकडे करण्याचा साखर कारखानदारांचा मनसुबा बुलंद होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर पहिली उचल एकरकमी मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मदानावर १४वी ऊस परिषद होत आहे. याकरिता खासदार राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी गेल्या पंधरवडय़ापासून दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात बठकांचा सपाटा लावला असून यंदाची परिषद विक्रमी होण्याची चिन्हे आहेत. या परिषदेची जय्यत तयारी सुरू असून लाखावर शेतकरी ऊस परिषदेला उपस्थित राहतील, असा अंदाज संघटनेकडून व्यक्त केला जात आहे.
साखरेचे दर घसरल्याने साखर उद्योग आíथकदृष्टय़ा अडचणीत सापडला आहे. अशातच राज्य बँकेने साखर मूल्यांकनात घट केली आहे. यामुळे हंगाम सुरू करताना साखर कारखान्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कायद्यानुसार ऊसतोड केल्यानंतर चौदा दिवसांमध्ये एफआरपी देणे बंधनकारक आहे. सद्य:स्थितीत या नियमाचे पालन करणे साखर उद्योगाच्या आíथक कुवतीबाहेरचे आहेत. त्यामुळे एफआरपी एकरकमी न देता ती दोन-तीन तुकडय़ांमध्ये देण्याच्या हालचाली साखर कारखानदारांनी सुरू केल्या आहेत. त्यासाठी काही बठकाही पार पडल्या आहेत. मंगळवारी जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखानदारांची बठक होऊन त्यामध्ये पुन्हा एकदा हाच मनोदय व्यक्त केला गेला. तर यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्व संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या महिन्यात येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला होता. तेव्हा एफआरपीची रक्कम एकरकमी मिळण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांनीही कायद्यानुसार ती एकरकमी न दिल्यास कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. तरीही या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. या पाश्र्वभूमीवर जयसिंगपूर येथे ऊस परिषद होत आहे. दरवर्षी हंगाम सुरू होण्यापूर्वी जयसिंगपूरमध्ये परिषद होऊन त्यामध्ये ऊसदराच्या मागणीसह लढय़ाची दिशा निश्चित केली जाते. यंदाच्या हंगामात एफआरपीसह अनेक महत्त्वाचे प्रश्न वाढून ठेवले असल्याने त्याबाबत खासदार शेट्टी कोणता निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष एकवटले आहे. या परिषदेत खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवि तुपकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 5th Nov 2015 रोजी प्रकाशित
स्वाभिमानी संघटनेची उद्या जयसिंगपूरला ऊस परिषद
एफआरपीचे तुकडय़ांना विरोध
Written by अपर्णा देगावकर

First published on: 05-11-2015 at 03:15 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tomorrow swabhimani sanghatana cane council in jaysingpur