रासायनिक पदार्थाचे उत्पादन घेणाऱ्या कंपनीमध्ये बांधकामाच्या ठिकाणच्या टाकीचा स्फोट होऊन २ कामगार ठार तर १ जण गंभीर जखमी झाला. हा प्रकार शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या युनिकेम लॅबॉरेटरीज प्रा. लि. या कंपनीत घडला. या घटनेनेनंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीसाठी दरवाजे बंद केल्याने संभ्रम निर्माण झाला.
गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांनी या प्रकाराची माहिती पत्रकारांना दिली. छोटुप्रसाद भीमबंद (वय २८) व गिरिजाप्रसाद जुनेतीबीन (वय ४५) अशी ठार झालेल्या कामगारांची नावे आहेत, तर मेहंदीहसन अन्सारी (वय २५) असे जखमी कामगाराचे नाव आहे. हे सर्व जण उत्तर प्रदेशातील कामगार आहेत.
युनिकेम लॅबॉरेटरीज प्रा. लि. हा उद्योग समूह आहे. त्यांच्या येथील युनिटमध्ये रासायनिक पदार्थाचे उत्पादन घेतले जाते. तसेच आणखी विस्तार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी बांधकाम केले जात आहे. कामाच्या ठिकाणी सुमारे ८० कामगार काम करत होते. बहुतेक कामगार उत्तर प्रदेशातील आहेत. तेथील एक टाकीवर टेस्टिंगचे काम सुरु होते. टाकीत हवेचा दाब मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे दबलेल्या हवेचा दाब पडून जोरदार स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी होती जवळ उभे असलेले तीन कामगार सुमारे ५० फूट उंच उडून जमिनीवर कोसळले. याबाबत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात व्यवस्थापनाविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.