कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी मतदारयादीमध्ये निर्माण झालेला सावळा गोंधळ सुधारण्यात आला असून, सुधारित मतदारयादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जात आहे. सुधारित यादी संकेतस्थळावर डाऊनलोड होण्यास वेळ लागत असला तरी रविवारी नागरिकांना ती सातही विभागीय कार्यालयांमध्ये पाहता येईल, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने शनिवारी सायंकाळी केले. तथापि, महापालिका प्रशासनाने हे काम पूर्ण केलेले नसताना डाऊनलोड होण्यास विलंबाचे कारण दाखवले जात असल्याची शंका नगरसेवकांतून व्यक्त होत असून प्रशासनाचा दावा पोकळ असल्याचे सांगितले जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या मतदारयादीत मोठा गोंधळ निर्माण झाला. त्याचे पडसाद महापालिका सभेतही उमटले होते. सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याविरोधात जोरदार तक्रारी केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यांनी मतदारयादीतील दोष दुरुस्तीकडे लक्ष दिले. सुधारित यादी जनतेला लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगितले गेले. शनिवारी सुधारित यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर सोडण्यात आली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यादी डाऊनलोड होण्यास वेळ लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संकेतस्थळावर यादी मिळण्यास विलंब होत असला तरी मतदार नागरिकांच्या सोयीसाठी यादी पाहण्याची सोय सात विभागीय कार्यालयांमध्ये करण्यात आली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असला तरी महापालिका निवडणुकीसाठी कार्यरत असलेल्या या सर्व कार्यालयांत यादी पाहण्यासाठी खुली केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मतदारयादी संकेतस्थळावर उपलब्ध न होण्याचा मुद्दा नगरसेवकांना पटताना दिसत नाही. मोठय़ा क्षमतेच्या मतदारयाद्या वा तत्सम माहिती विनाविलंब डाऊनलोड होण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध असताना नेमका महापालिकेलाच विलंबाची समस्या कशी जाणवत आहे, असा प्रतिप्रश्न उपस्थित करीत प्रशासनाने यादी सायंकाळपर्यंत डाऊनलोडच केली नव्हती, अशी शंकाही ते उपस्थित करीत आहेत. शनिवारी दुपापर्यंतही दुरुस्तीचे काम प्रशासनाकडून सुरू होते. याकडे लक्ष वेधत नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाची अनागोंदी अद्यापही सुरू असल्याची टीका केली.
संग्रहित लेख, दिनांक 4th Oct 2015 रोजी प्रकाशित
सुधारित मतदारयादी आज उपलब्ध होणार
सुधारित मतदारयादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
Written by अपर्णा देगावकर

First published on: 04-10-2015 at 03:15 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Updated voter lists will be available today