कोल्हापूर : मोटारीला आग लागून ती बेचिराख झाली. हर्षद अरुण वाघमारे (रा. टोप, ता. हातकणंगले) यांच्या मालकीची ही मोटार आहे. हा प्रकार कबनूर (ता. हातकणंगले) गावानजीक बुधवारी घडला असून यांची नोंद पोलिसात झाली आहे.
हर्षद वाघमारे हे पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहेत. त्यांनी दोन वर्षापूर्वी मोटार खरेदी केली आहे. ते दुपारी चंदूर (ता. हातकणंगले) येथे कंपनीच्या कामानिमित्याने जात असताना कबनूर गावालगतच्या कोन्नूर पार्क समोर बंद पडली. त्यांनी ती रस्त्यावर उभी केली. पेट्रोल संपून मोटार बंद पडली असावी या शक्यतेने ते मित्रासमवेत दुचाकीवरुन पेट्रोल पंपावर गेले. परत आल्यावर त्यांना मोटारीमधून धूर बाहेर येवू लागल्याचे दिसून आले. त्यांनी मोटारीची पाहणी केली असताना इंजिनमधून आगीच्या ज्वाला बाहेर येवू लागल्या. प्रसंगावधान राखून ते मोटारीपासून बाजूला झाले.
हेही वाचा – भाजपला पराभूत करण्यासाठी भाकप इंडिया आघाडी – राष्ट्रीय महासचिव डी. राजा
घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग त्वरीत आटोक्यात आणली. तोपर्यंत संपूर्ण मोटार आगीत जळून खाक होऊन फक्त सांगाडा शिल्लक राहिला.