करवीरनगरीत जलवर्षावात गणेशाचे उत्साहात आगमन

जलवर्षावात न्हाऊन निघत गणेशभक्तांनी करवीरनगरी विघ्नहर्त्या गणरायाचे मंगलमय वातावरणात स्वागत केले.

जलवर्षावात न्हाऊन निघत गणेशभक्तांनी करवीर नगरी विघ्नहर्त्या गणरायाचे मंगलमय वातावरणात स्वागत केले. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. वाढती महागाई, मंदीचे सावट, दुष्काळाची छाया अशा नानाविध संकटांना बाजूला ठेवत शहर व परिसरात श्री गणेशांचे वाजत-गाजत जल्लोषात स्वागत झाले. असंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच घरोघरी उदंड उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात श्री गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गत दोन-तीन दिवसांपासून घरोघरी लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होती. गणरायाच्या आगमनाचा दिवस उजाडल्यापासूनच भाविकांमध्ये उत्साह दाटून आला होता. शहरातील मिरजकर तिकटी, लक्ष्मीपुरी, बापट कॅम्प येथील कुंभारवाडे तसेच श्रीमूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या स्टॉलवर लगबग जाणवत होती. विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी माळा, फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी व मंगलमय वातावरणात विघ्नहर्त्यांची भक्तिभावे विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरातील मानाच्या गणपतींचे आणि विविध गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीचे वाजत गाजत मिरवणुकीने आगमन झाले. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात या गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळत राहिल्या तरी भक्तीत रममाण झालेले भक्त त्याची पर्वा न करता श्रींच्या स्वागतात मग्न झाले होते.
दुपारनंतर सार्वजनिक तरुण मंडळाचे कार्यकत्रे श्री मूर्ती आणण्यासाठी बाहेर पडले. मोठय़ा मूर्ती बनविलेल्या ठिकाणी तरूण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केल्याने पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. दुपारनंतर पावसानेही विश्रांती घेतल्याने गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहू लागला होता. हार, तुरे, फुले यांसह सजावटीचे साहित्य यात दुपटीने दरवाढ होऊनही बाजारातून या वस्तूंना चांगला उठाव होता. तुलनेने फटाक्यांच्या मागणीत मात्र लक्षणीय घट झाल्याचे दिसले. संपूर्ण शहर गणेशमय झाले असून पुढील दहा दिवस केवळ बाप्पांचाच निनाद ऐकू येणार आहे. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून बाहेरूनही बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
डॉल्बीचा आवाज मंदावला
गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनाने डॉल्बीच्या आवाजावर र्निबध घातल्याने पारंपरिक वाद्यांना सुगीचे दिवस आल्याचे दिसत होते. डॉल्बीला ठराविक डेसिबलपर्यंतच ध्वनिमर्यादा निर्धारित केल्याने गणरायाच्या मिरवणुकीसाठी बँजो, ढोल-ताशे यांसारख्या पारंपरिक वाद्यांसह बँड पथकांनाही मागणी वाढल्याचे दिसत होते. डॉल्बीवरील प्रतिबंधामुळे गणरायाच्या मिरवणुकीत ढोल, ताशांचा गजर पहावयास मिळत होता.
डॉल्बी मुक्तीचा बोजवारा
यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्याचा प्रयत्न जिल्हा पोलिस प्रशासनाचा असला, तरी गणरायाच्या आगमनाच्या पहिल्या दिवशीच त्याचा बेंडबाजा वाजला. सकाळी घरगुती गणपती आणले जात असताना पारंपरिक वाद्यांचा वापर झाला. तथापि सायंकाळी तरुण मंडळांनी श्रींची मूर्ती आणताना डॉल्बी वाजवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अशा मंडळांवर कारवाई करण्यास सुरु केल्याने त्यातून कार्यकर्त्यांशी वादावादी झाली. यंदा महापालिकेची निवडणूक महिन्याभरात असल्याने मंडळांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचेही दिसून आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Welcome to lord ganesha with enthusiasm