कोल्हापूर : मराठी भाषेच्या अस्मितेसाठी गेली साठ वर्षे सातत्याने संघर्ष करणाऱ्या सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शुक्रवारी काळा दिन पाळण्यात आला. चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगांवमध्ये दैनंदिन व्यवहार बंद ठेवले. काळी वस्त्रे , काळे झेंडे, हाताला आणि तोंडालाही काळया फिती बांधून आबालवृद्ध भव्य मूक फेरीत एकजुटीने सहभागी झाले होते. महाराष्ट्रात जाण्याच्या जिद्दीचे दर्शन घडवत हजारो मराठी भाषक फेरीत सहभागी झाले. १ नोव्हेंबर १९५६ या दिवशी कर्नाटक राज्याची निर्मिती होऊ न बेळगाव, गुलबर्गा, बिदर, भालकी, निपाणी आदी मराठी भाषक भाग आणि ८१४ गावे कर्नाटकात सामील करण्यात आली. तेव्हापासून बेळगाव परिसरात १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. आज प्रतिवर्षी प्रमाणे कर्नाटकव्याप्त मराठी भाषक सीमाभागात कडकडीत ‘काळा दिन’ पाळण्यात आला. कर्नाटक सरकारने नेहमीप्रमाणे या फेरीला शेवटच्या टप्प्यात जाचक अटी आणि शर्तीवर परवानगी देण्याचा अनुभव आजही कायम होता. बोलके फलक  आजच्या या निषेध फेरीतून सीमाबांधवांनी आपली एकजूट दाखवून दिली. संभाजी उद्यान येथून फेरीला सुरुवात झाली. कर्नाटक शासन, पोलीस यंत्रणेला त्रास होईल असे अपशब्द उच्चारू नयेत अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे तरुणांनी आपला संताप व्यक्त करणारे फलक हाती घेतले होते. ‘आले किती गेले किती सीमाप्रश्न सोडवणार फक्त समिती’ , ‘बाप होता आता मीही आहे लढय़ात’ अशा घोषणा त्यावर होत्या. याचवेळी सीमाभागातील नेत्यांच्या हेव्यादाव्यातून सीमाप्रश्न रेंगाळला असल्याने त्यावरही बोचरी टीका करणारा मजकूर होता. ‘नेत्यांच्या दुहीचा सीमाप्रश्नाला फटका’ असा परखड मजकूर फलकावर होता. महाराष्ट्राचे पाठबळ

शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते आमदार एकनाथ शिंदे यांनी मोबाइलवरून सीमावासीय बांधवांशी संवाद साधला. ‘शिवसेना कायम सीमा बांधवांच्या पाठीशी आहे. शिवसेनेने सीमा भागासाठी ६९ शिवसैनिकांचे बलिदान दिले आहे. बेळगाव , कारवार, निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीवर शिवसेना आजही ठाम असून शिवसेना सीमा बांधवांसाठी जे जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न करणार आहे,’ असे त्यांनी सांगितले. ‘बेळगावमध्ये १९८६ साली हिंसक आंदोलन प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. मी स्वत: एक महिना बेल्लारी तुरुंगात होतो’, अशी आठवण त्यांनी संगितली. बेळगावला लागून असलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी ‘माझे वडील माजी आमदार नरसिंग पाटील हेही या लढय़ात सहभागी होते. सीमावासीयांचे प्रश्न राज्याच्या विधानसभेत हिरिरीने मांडणार आहे. शरद पवार हे नेहमीच सीमावासीयांना मदत करीत आले आहेत’, असे त्यांनी सांगितले.