मध्य प्रदेशमध्ये सध्या चर्चा सुरु आहे ती १९ वर्षीय रामेश्वर गुज्जर या मुलाची. या चर्चेमागील कारण म्हणजे रामेश्वरने १०० मीटरचे अंतर ११ सेकंदात पार केले आहे. शिवापुरी तालुक्यात राहणाऱ्या रामेश्वरच्या या कामगिरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने या मुलाला भोपाळमध्ये बोलवून घेतल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

गुज्जरला मध्य प्रदेश सरकारमधील क्रिडा मंत्र्यांनी भोपाळमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे. सोशल मिडियावर गुज्जरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारने हे पाऊल उलले आहे. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी गुज्जरला भारताचा उसेन बोल्ट असल्याचे म्हटले आहे. ‘या मुलाला थोड्या सोयी सुविधा आणि प्रशिक्षण मिळाले तर तो १०० मीटरचे अंतर ९ सेकंदात पार करु शकतो,’ या कॅप्शनसहीत हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

मध्य प्रदेशचे क्रिडा मंत्री जितू पाटवारी यांनीही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गुज्जरला भोपाळमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे. ‘जर एखाद्या मुलांकडे कौशल्य असेल तर मध्य प्रदेशमधील क्रिडा मंत्रालय नेहमीच त्यांच्या पाठीशी असेल,’ असं पाटवारी यांनी सांगितले. गुज्जरची कामगिरी पाहून पाटवारी खूपच खूष झाल्याची माहिती सरकारच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार गुज्जरने दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्याने शिक्षण सोडून दिले आहे.

गुज्जरला योग्य प्रशिक्षण देण्याची तयारीही क्रिडामंत्र्यांनी दाखवली आहे. तसेच गरीब घरामधून आलेल्या या मुलाने खरोखरच १०० मीटरचे अंतर ११ सेकंदात पूर्ण केले असेल आणि हा व्हिडिओ छेडछाड केलेला नसेल तर सर्व प्रकारची मदत देण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये गुज्जर एकटाच एका रस्त्यावरुन १०० मीटरचे अंतर ११ सेकंदात पार करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की जगातील सर्वात वेगवान धावपटू असणाऱ्या उसेन बोल्टच्या विक्रमापासून गुज्जर अवघा दीड सेकंद मागे राहिला. २००९ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतीम फेरीमध्ये बोल्टने १०० मीटरचे अंतर ९.५८ सेकंदांमध्ये पुर्ण केले होते.