भारताला या वर्षांत बुद्धिबळ, बॉक्सिंग, कुस्ती व नेमबाजी या चारही खेळांमध्ये संमिश्र यश मिळाले. बुद्धिबळ या चौसष्ट घरांच्या खेळात भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला सरत्या वर्षांत फारसा प्रभाव पाडता आला नाही. याउलट २४ वर्षीय द्रोणावली हरिकाने विविध स्पर्धामध्ये आपली छाप पाडली. बॉक्सिंगमध्ये संघटनात्मक वादांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की झाली. मात्र प्रो बॉक्सिंगमध्ये पदार्पण करणारा विजेंदर सिंग आणि जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत पदक जिंकणाऱ्या शिवा थापामुळे भारताला थोडासा दिलासा मिळाला. भारताच्या सात नेमबाजपटूंनी या वर्षांत रिओ ऑलिम्पिक पात्रतेचे उद्दिष्ट साध्य केले. देशभरातल्या निमशहरी भागातल्या युवा नेमबाजपटूंची दिमाखदार कामगिरी यंदाच्या वर्षांचे वैशिष्टय़ ठरले. मुंबईच्या नरसिंग यादवने जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताला एकमेव पदक मिळवून देत ऑलिम्पिकमधील भारताचे प्रतिनिधीत्व निश्चित केले.

बुद्धिबळ

पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मानकरी ठरलेला विश्वनाथन आनंद याच्यासाठी सरते वर्ष समाधानकारक नव्हते. त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले.

ज्युरिच बुद्धिबळ चॅलेंज स्पध्रेतील विजेतेपद वगळता त्याला शामकिर बुद्धिबळ (उपविजेता), नॉर्वे बुद्धिबळ (उपविजेता) स्पर्धामध्ये त्याला जेतेपदाने हुलकावणी दिली. गतविजेत्या आनंदला लंडन क्लासिक स्पध्रेत साजेसा खेळ करण्यात अपयश आले आणि त्याची थेट नवव्या स्थानावर घसरण झाली.

निराशाजनक वर्ष असूनही आनंदचा पूर्वाश्रमीच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. आकाशगंगेतील एका दुर्मीळ ग्रहाला विश्वनाथन आनंद याचे नाव देण्यात आले. भारतीय इतिहासातील हा पहिलाच क्षण ठरला.

ग्रॅण्डमास्टर द्रोणावली हरिकासाठी २०१५ हे वर्ष स्वप्नवत ठरले. तिने महिला विश्वचषक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत कांस्यपदक जिंकले. उपांत्य फेरीत तिला मारिया मुझीचुककडून पराभव पत्करावा लागला.

चीनमध्ये पार पडलेल्या महिला विश्व सांघिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत वैयक्तिक रौप्यपदक पटकावून हरिकाने ऐतिहासिक झेप घेतली. यावर समाधान न मानता हरिकाने कोनेरू हम्पीसह  भारताला सांघिक प्रकारात चौथे स्थान मिळवून देत कांस्यपदक निश्चित केले.

विदिथ गुजराती, पद्मिनी राऊत, हम्पी, स्वाती घाटे, तानिया सचदेव, सौम्या स्वामिनाथन, परिमार्जन नेगी, अभिजित गुप्ता या भारताच्या काही अव्वल खेळाडूंनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आपली चमक दाखवली.

बॉक्सिंग

रिओ ऑलिम्पिकला अवघ्या वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना विजेंदर सिंगने प्रो बॉक्सिंगची निवड करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.

ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत देशाला बॉक्सिंगमधील पहिले पदकमिळवून देणाऱ्या विजेंदरच्या या निर्णयावर सडकून टीका झाली, परंतु प्रो बॉक्िंसगमध्ये यश मिळवून त्याने टीकाकारांची तोंडे बंद केली.

रिओमध्ये पदकाचे आशास्थान असलेल्या विजेंदरने हा निर्णय घेऊन चूक केली, असेही अनेकांना वाटते. विजेंदरच्या या निर्णयामुळे त्याची जागा भरून काढण्यास समर्थ असा बॉक्सिंगपटू अजूनही सापडलेला नाही.

शिवा थापा (५६ किलो), मनदीप जांगरा (६९ किलो) आणि विकास क्रिष्णन (७५ किलो) यांनी विविध स्पर्धामधून आपली छाप उमटवली. त्यात शिवाच्या कामगिरीचा विशेष उल्लेख करायला हवा. त्याने जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत पदकाची कमाई करून विक्रम प्रस्तापित केला. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला.

आसामच्या २२ वर्षीय शिवा थापाने आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत कांस्यपदक पटकावले. त्यानंतर जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतही कांस्यपदक जिंकले. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदकविजेत्या खेळाडूंमध्ये शिवा हा प्रबळ दावेदार मानला जातो.

भारताच्या राष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेवर गेल्या तीन वर्षांत दोनवेळा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धावर आणि एकूणच  ऑलिम्पिक तयारीवर त्याचा परिणाम झाला.

गतवर्षी आशियाई स्पध्रेच्या पदकवितरण सोहळ्यातील गैरवर्तणुकीनंतर एका वर्षांची शिक्षा पूर्ण करून रिंगमध्ये परतलेल्या एल. सरिता देवीने दमदार पुनरागमन केले. चीनमधील सराव स्पध्रेत सरिताने उल्लेखनीय कामगिरी केली.

नेमबाजी

स्कीट नेमबाजी हा प्रकार भारतीयांकडून दुर्लक्षित राहायचा. मात्र यंदा मैराज अहमद खानच्या रूपात स्कीट प्रकारातही भारताने छाप उमटवली. स्कीट प्रकारातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा मैराज हा पहिला भारतीय नेमबाज ठरला.

मूळचा नेपाळचा आणि आता भारतीय लष्कराचा भाग असणारा जितू रायने रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला नेमबाजपटू होण्याचा मान मिळवला. जितूसह भारताला पहिलेवहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणारा अनुभवी अभिनव बिंद्रा, लंडन ऑलिम्पिक पदकप्राप्त गगन नारंग, जयपूरची युवा अपूर्वी चंडेला, प्रकाश नानजप्पा, चैन सिंग यांनीही रिओ ऑलिम्पिकवारी पक्की केली.

मानवजीत सिंग संधू, विजय कुमार, राही सरनोबत, हीना सिधू, अयोनिका पॉल यांना पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेद्वारे ऑलिम्पिकसाठी पात्र  ठरण्याची संधी आहे.

महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळे, सुमेधकुमार वडावाला, प्राची गडकरी यांच्यासह अनंतजीत सिंग नारुका, आंचल प्रताप सिंग यांनी विविध स्पर्धामध्ये केलेली भरघोस पदकांची कमाई हुरूप वाढवणारी आहे. हीना सिधूने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले.

२०१७ मध्ये शॉटगन, रायफल, पिस्तूल या तिन्ही प्रकारांचा समावेश असलेल्या नेमबाजी विश्वचषकाचे आयोजन भारतात होणार आहे. यंदाच्या वर्षांत खेळाव्यतिरिक्त संघटनात्मक पातळीवर भारताचे महत्त्व दर्शवणारी ही घटना आहे. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्यानंतर नेमबाजी संघटना २०१८ मध्ये प्रतिष्ठेच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे भारतात आयोजन करण्यास उत्सुक आहे.

रायफल प्रशिक्षक स्टॅनिसलाव्ह लॅपिडय़ूस यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती, प्रलंबित निर्णय तसेच राष्ट्रीय दर्जाचा नेमबाज सिपी सिधूची झालेली हत्या या घटनांमुळे समाधानकारक कामगिरी वर्षांला गालबोट लागले.

कुस्ती

ऑलिम्पिक कांस्यपदकविजेत्या योगेश्वर दत्त याची तंदुरुस्तीच्या कारणास्तव जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून ऐन वेळी माघार. तंदुरुस्त नसतानाही स्पर्धेला गेल्यामुळे तो टीकेचा धनी ठरला.

जागतिक स्पध्रेत सुशील कुमारच्या अनुपस्थितीमुळे ७४ किलो गटात नरसिंग यादवला संधी मिळाली. त्याने कांस्यपदक मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली. यासह त्याने ऑलिम्पिकमधील भारताचे प्रतिनिधीत्व निश्चित केले, परंतु या गटातून ऑलिम्पिकमध्ये सुशील व नरसिंग यापैकी कोणाची वर्दी लागणार याची उत्सुकता असेल.

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही नरसिंग यादवने कांस्यपदक पटकावले, तर महिलांमध्ये विनेश फोगाटला रौप्य तर ललिता सेहरावत, गीता फोगाट व साक्षी मलिक यांना कांस्य मिळाले.

आशियाई कॅडेट स्पर्धेत फ्री स्टाइल व महिलांमध्ये भारताला उपविजेतेपद, तर ग्रीकोरोमनमध्ये पाचवे स्थान मिळाले. नवीनकुमार, सूरजराज कुमार, अरुणकुमार, प्रदीपकुमार, दिव्या काकरन यांनी सुवर्णपदक जिंकले. नासिर हुसेन, रीनाकुमारी, निशाकुमारी, अन्नुदेवी, अंकुशादेवी यांनी रौप्य, तर दीपककुमार, सुमीतकुमार, मोनू यांना कांस्यपदक जिंकले.

आशियाई कनिष्ठ स्पध्रेत भारताला तीन सुवर्ण, चार रौप्य व आठ कांस्यपदकांची कमाई केली. रवीकुमार, मेहेरसिंग, रवींद्रसिंग यांना सुवर्णपदक पटकावले.

कुस्तीमध्येही प्रो लीगचा श्रीगणेशा झाला. योगेश्वर दत्त व सुशीलकुमार यांच्यापेक्षा युक्रेनची महिला खेळाडू ओक्साना हरहेल ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. महाराष्ट्राच्या राहुल आवारेलाही चांगला भाव मिळाला. पहिल्या प्रो लीगमध्ये मुंबई गरुडा संघ विजेता ठरला.