बॉक्सिंग

एल. सरिता देवी (६० किलो), मनोज कुमार (५९ किलो) आणि पदार्पणवीर मोहम्मद हुसामुद्दीन (५६ किलो) या बॉक्सर्सनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या सरिताने बार्बाडोसच्या किम्बर्ली जिट्टन्सवर विजय मिळवला. इंडिया ओपन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या हुसामुद्दीनला व्हॅनूअ‍ॅटूच्या बोए वारावारावर विजय मिळवण्यासाठी फार संघर्ष करावा लागला नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक जिंकण्यासाठी उत्सुक असलेल्या ३१ वर्षीय मनोजने टांझानियाच्या कासीम मॅबुंडविकेवर विजय मिळवला. २०१०मध्ये मनोजने सुवर्णपदक जिंकले होते.

नेमबाजी : मनू, हीना यांच्या कामगिरीबाबत उत्सुकता

उज्ज्वल भवितव्य असलेली युवा खेळाडू मनू भाकेर या १६ वर्षीय खेळाडूसह हीना सिधू, रविकुमार व दीपक कुमार हे खेळाडू कशी कामगिरी करतात, यावरच भारताचे नेमबाजीत यशापयश अवलंबून आहे. नेमबाजी स्पर्धा रविवारी सुरू होत आहे.

बेलमॉन्ट नेमबाजी स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेतील महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये मनू व हीना या दोन्ही भारतीय खेळाडूंमध्येच पदकासाठी चुरस आहे. मनूची ही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा आहे. तिने यंदाच्या मोसमातील जागतिक स्पर्धाच्या मालिकेत आतापर्यंत चार सुवर्णपदकांची लयलूट केली आहे. त्यापैकी दोन सुवर्णपदके तिने सिडनी येथील स्पर्धेत मिळवली आहेत. त्यामुळेच तिच्याकडून येथे त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. हीना ही ऑलिम्पिकपटू असल्यामुळे तेथील अनुभवाचा फायदा ती कसा घेते हीच उत्कंठा आहे.

पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये दीपक व रवी  आपले नशीब अजमावणार आहेत. स्कीट प्रकारात स्मितसिंग व शिराज शेख हे भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत. महिलांच्या स्कीट प्रकारात सानिया शेख व माहेश्वरी चौहान यांच्यावर भिस्त आहे.

जिम्नॅस्टिक्स

जिम्नॅस्टिक्सच्या पुरुष वैयक्तिक अष्टपैलू गटाच्या अंतिम फेरीत योगेश्वर सिंगला १४व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने सहा प्रकारांत एकूण ७५.६० गुणांची कमाई केली.

बास्केटबॉल

मलेशिया आणि इंग्लंड यांनी अनुक्रमे भारताच्या महिला व पुरुष संघाला पराभवाची चव चाखवली. महिलांच्या लढतीत मलेशियाने ८५-७२ अशा फरकाने, तर पुरुष गटात इंग्लंडने १००-५४ अशा फरकाने भारतीय संघावर मात केली.

टेबल टेनिस

भारताच्या पुरुष व महिला टेबल टेनिस संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष व महिला संघाने मलेशियाच्या संघांवर ३-० असा विजय मिळवला. पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत हरमीत देसाई, शरथ कमल यांनी एकेरीत, तर देसाई व साथीयन ग्यानसेकरन यांनी दुहेरीत विजय मिळवले. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत मनिका बात्रा, मधुरिका पाटकर यांनी एकेरीत आणि मधुरिका व मौमा दास यांनी दुहेरीत बाजी मारली.

बॅडमिंटन

भारताने मिश्र सांघिक गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. किदम्बी श्रीकांतच्या दमदार खेळाच्या जोरावर भारतीय संघाने मॉरिशसचा ३-० असा धुव्वा उडवला. श्रीकांतने एकेरीत २१-१२, २१-१४ अशा फरकाने जॉर्जेस ज्युलियन पॉलचा पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरीत सात्विक रान्किरेड्डी व चिराग शेट्टी आणि महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांनी विजय मिळवत भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला.

स्क्वॉश

जोश्ना चिनप्पाला उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडच्या जॉली किंगकडून हार पत्करावी लागली. जॉलीने ११-५, ११-६, ११-९ अशा फरकाने विजय मिळवला.