भारतीयांसाठी सोमवार हा अटकवार ठरला. आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकणातील सट्टेबाजांना पकडण्याची मोहिम पोलिसांनी तीव्र केली आणि देशभरातील विविध शहरांतून २९ सट्टेबाजांना अटक करण्यात आली. गोव्यातील सहा सट्टेबाजांच्या केलेल्या चौकशीमध्ये आयपीएलमधील अजून तीन खेळाडू फिक्सिंमध्ये असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली असून त्यांना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील सट्टेबाजांचे तर थेट पाकिस्ताच्या सट्टेबाजांशी संबंध असल्याचेही उघड झाले आहे.
गोवा : आयपीएलच्या सट्टेबाजांना अटक करण्याची मोहीम तीव्र होत असताना गोव्यामध्येही दिल्ली पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये सहा सट्टेबाजांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अजून तीन खेळाडू फिक्सिंगप्रकरणी गोत्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला काही सट्टेबाजांची चौकशी करताना गोव्यामधील कॅसिनोमध्ये काही सट्टेबाज असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती गोवा पोलिसांना दिली आणि त्या सट्टेबाजांवर नजर ठेवायला सांगितले.
मुंबई : मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकत दोन सट्टेबाजांना अटक केली असून त्यांचे पाकिस्तानमधील सट्टेबाजांची कनेक्शन असल्याची माहिती हाती आली आहे. या दोन सट्टेबाजांनी पाकिस्तानातील सट्टेबाजांशी सौदा केला होता आणि त्यांच्याकडून पैसे घेतले असल्याची माहिती उघडकीस आली आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे.
कानपूर : आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ६ कथित सट्टेबाजांना पोलिसांनी कानपूरमध्ये अटक केली. या सहाजणांचा आंतरराष्ट्रीय सट्टेबाजांच्या टोळीशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. या सहाजणांकडून १० लाख रुपये रक्कम, ५ लॅपटॉप आणि २५ मोबाइल फोन ताब्यात घेतले.  
पटना : आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी पाटलीपुत्र पोलिसांनी सहा जणांना अटक केल्याचे वृत्त आहे. पोलिसांना सट्टेबाजीची माहिती मिळाली होती आणि त्यानुसार त्यांनी नेहरूनगर भागात छापा टाकला आणि सहा जणांना अटक केली. आम्हाला आयपीएलच्या अंतिम सामन्यावर काही जण सट्टा लावत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार त्या ठिकाणी आम्ही छापा टाकला आणि पुराव्यांसह सहा जणांना आम्ही ताब्यात घेतले, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी मनू महाराज यांनी सांगितले.
औरंगाबाद : आयपीएलची स्पर्धा मॅच फिक्सिंगसह वेगवेगळ्या वादांनी चांगलीच गाजली. स्पर्धेतील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यावर सट्टा लावणाऱ्या सोलापूरच्या बुकीला औरंगाबादमध्ये मुद्देमालासह अटक करण्यात आली. संजय रमेश ठक्कर (वय ४४) असे या बुकीचे नाव असून शहरातील जालना रस्त्यावरील हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये मुद्देमालासह त्याला पकडण्यात आले.
पिंपरी : ‘आयपीएल’ च्या मुंबई-चेन्नई क्रिकेट संघातील अंतिम सामन्यावर बेटिंग लावणाऱ्या पाचजणांना पिंपरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून दोन लाख ६० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. तथापि, बुकी फरार झाला आहे.