‘व्हॅलेंटाईन डे’च्या प्रेमळ मुहूर्तावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. एकीकडे प्रेमाचा अंकुर फुटायला अलवारपणे सुरुवात होणार असली तरी दुसरीकडे भारतासाठी न्यूझीलंड दौऱ्यात विजयाचा अंकुर फुटलेला नाही, त्यामुळे या ‘प्रेमळ’ मुहूर्तावर भारताच्या विजयाचा अंकुर फुटायला हवा, अशी अपेक्षा साऱ्या भारतीयांची असेल. आतापर्यंत एकही विजय पदरी न पडल्याने पहिल्या विजयासाठी भारत आसुसलेला आहे. त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करून शेवट तरी गोड करण्याचा निश्चय भारतीय संघाचा असेल, तर दुसरीकडे आतापर्यंतची विजयी घोडदौड कायम ठेवण्याकडे न्यूझीलंडचा कल असेल.
एकदिवसीय मालिकेत भारताला ०-४ असा मानहानीकारक पराभव सहन करावा लागला होता. ऑकलंड येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ४० धावांनी पराभव झाला होता. या पाश्र्वभूमीवर भारतीय संघाला या सामन्यात तरी विजय मिळवून मालिाक बरोबरीत सोडवणे अपरिहार्य असेल.
भारतीय गोलंदाजांना पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात चांगली कामगिरी करता आली नसली तरी दुसऱ्या डावात मात्र त्यांनी कमाल केली होती. खासकरून मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांची भेदक मारा केला होता. अनुभवी झहीर खानला बळी मिळाले असले तरी त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. फलंदाजीमध्ये सलामीवीर शिखर धवनला अखेर सूर गवसला असून दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावून संघासाठी विजयाचे दार खुले केले होते, पण मधल्या फळीतील फलंदाजांना त्याचा फायदा उचलता आला नव्हता. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांच्याकडून संघाला मोठय़ा खेळींची अपेक्षा असेल. अजिंक्य रहाणेला चुकीच्या पद्धतीने बाद दिले असले तरी त्याच्याकडून तीन अंकी धावसंख्येची अपेक्षा असेल.
 महेंद्रसिंग धोनीला एकदिवसीय मालिकेत चांगली फलंदाजी करता आली असली तरी त्याचा परिणाम कसोटी सामन्यात दिसून आला नव्हता. रवींद्र जडेजा हा गोलंदाजी चांगली करत असला तरी कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करण्याची मानसिक क्षमता त्याने वाढवायला हवी. गोलंदाजी हे न्यूझीलंडचे बलस्थान आहे. टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट आणि नील व्ॉगनर यांनी भारतीय फलंदाजांची चांगलीच फे फे उडवली होती. त्यामुळे या तिघांकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल. फलंदाजीमध्ये पहिल्या सामन्यात ब्रेन्डन मॅक्क्युलमने द्विशतक झळकावले होते, तर केन विल्यमसनही चांगल्या फॉर्मात आहे. पण न्यूझीलंडला गोलंदाजीपेक्षा फलंदाजीवर अधिकाधिक भर देण्याची गरज असेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), शिखर धवन, मुरली विजय, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, वृद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, झहीर खान, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि ईश्वर पांडे.
न्यूझीलंड : ब्रेन्डन मॅक्क्युलम (कर्णधार), कोरे अँडरसन, ट्रेंट बोल्ट, पीटर फुल्टन, हमिश रुदरफोर्ड, जेम्स नीशम, टीम साऊदी, टॉम लॅथम, नील व्ॉगनर, बी.जे. वॉल्टिंग (यष्टीरक्षक), केन विल्यमसन आणि ईश सोधी.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स वाहिनीवर. वेळ : पहाटे ३.३० वा. पासून.