रेयाल माद्रिदने विक्रमी ३४व्यांदा ला-लिगा फुटबॉलचे विजेतेपद पटकावले. व्हिलारेयालला २-१ नमवत एक लढतआधीच माद्रिदने चषक उंचावला. सध्याच्या घडीला सर्वोत्तम फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या बार्सिलोनाची ला-लिगाचे जेतेपद राखण्याची संधी मात्र हुकली.

माद्रिदचे हे २०१७ नंतरचे पहिले ला-लिगा विजेतेपद ठरले. करिम बेन्झेमाचे दोन गोल हे व्हिलारेयालवर मिळवलेल्या विजयात मोलाचे ठरले. बेन्झेमाने याबरोबरच ला-लिगा हंगामातील गोलांची संख्या २१वर नेली. माद्रिदचा हा या स्पर्धेतील सलग १०वा विजय ठरला. करोनामुळे ज्यावेळेस फुटबॉल स्पर्धा मार्चमध्ये थांबल्या त्यावेळेस रेयाल माद्रिद हा अग्रस्थानी असलेल्या बार्सिलोनापेक्षा दोन गुणांनी पिछाडीवर होता. मात्र जूनमध्ये स्पर्धेला पुन्हा सुरुवात झाल्यावर रेयाल माद्रिदने विजय मिळवले. याउलट लिओनेल मेसीच्या बार्सिलोनाला काही लढतींत बरोबरी पत्करावी लागली. गुरुवारी १० खेळाडूंसह खेळावे लागणाऱ्या ओसासुनाविरुद्ध बार्सिलोनाला १-२ धक्कादायक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे रेयालच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

झिदान प्रशिक्षक म्हणूनही यशस्वी

रेयाल माद्रिदचे माजी सर्वोत्तम फुटबॉलपटू झिनेदिन झिदान हे प्रशिक्षक म्हणूनही या संघासाठी यशस्वी ठरले. रेयाल माद्रिदचा माजी सर्वोत्तम फुटबॉल ख्रिस्तियानो रोनाल्डो दोन हंगामांपूर्वी युव्हेंटसशी करारबद्ध झाला होता. मात्र तरीदेखील झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली रेयाल माद्रिदने विजेतेपद उंचावले. झिदान यांना खेळाडूंनी उचलून घेत जल्लोष केला.

प्रेक्षकांना एकत्र न येण्याचे आवाहन

करोनाचा धोका लक्षात घेता सुरक्षित अंतर राखावे म्हणून रेयाल माद्रिद संघव्यवस्थापनाने चाहत्यांना एकत्र जमू नये अशी विनंती केली होती. त्यामुळे माद्रिदच्या चाहत्यांनी रस्त्यावर त्यांच्या गाडय़ांचे हॉर्न वाजवत अनोख्या पद्धतीने जल्लोष केला.

चॅम्पियन्स लीगसाठी ‘ईपीएल’मध्ये चुरस

लंडन : पुढील हंगामात चॅम्पियन्स लीगमध्ये स्थान पटकावण्यासाठी इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (ईपीएल) असणारी चुरस २६ जुलैपर्यंत होणाऱ्या अखेरच्या लढतीपर्यंत कायम राहणार आहे. मँचेस्टर युनायटेड आणि लिस्टर सिटी यांनी गुरुवारी त्यांच्या लढती जिंकल्याने ही चुरस असणार आहे. लिस्टरने शेफिल्ड युनायटेडला २-० नमवले. युनायटेडने गुरुवारी क्रिस्टल पॅलेसला २-० असे नमवले. मँचेस्टर युनायटेड आणि लिस्टर सिटी या दोघांचेही ३६ सामन्यांतून समान ६२ गुण आहेत.

आमचा संघ कमकुवत असल्याचे ओसासुनाकडून झालेल्या पराभवाने सिद्ध झाले. रेयाल माद्रिदने त्यांच्या सर्व लढती जिंकत प्रभावी कामगिरी केली. त्यांनी विजेतेपदाला साजेसा खेळ केला. चॅम्पियन्स लीग जिंकण्याची संधी या संघामध्ये नाही असे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. आता तर ला-लिगादेखील जिंकू शकलो नाही.

– लिओनेल मेसी, बार्सिलोनाचा फुटबॉलपटू