क्रिकेटच्या पुस्तकात नसलेले, तंत्रशुद्धतेशी अजिबात संबंध नसलेले फटके मारून चेंडूला थेट प्रेक्षकांमध्ये भिरकावून देण्याची क्षमता असलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्य़ुजेस याची गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज  अखेरीस गुरुवारी समाप्त झाली. अवघ्या २५व्या वर्षी या धडाकेबाज तरण्याबांड क्रिकेटपटूची जीवनाची ‘इनिंग्ज’ संपुष्टात आल्याने क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवारी स्थानिक सामन्यात सलामीवीराची भूमिका निभावत असताना एका उसळत्या चेंडूमुळे डोक्याला मार लागून ह्य़ुजेस जखमी झाला होता. मैदानातच तो कोसळला. त्यानंतर कोमात गेलेल्या या युवा फलंदाजाला वाचवण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, अखेरीस ती व्यर्थ ठरली. छोटय़ाशा कारकीर्दीत ह्य़ुजेसने २६ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले होते. दरम्यान, ज्याच्या उसळत्या चेंडूमुळे ह्य़ुजेसला दुखापत झाली त्या सीन अ‍ॅबॉट या गोलंदाजाला या प्रकाराचा प्रचंड मानसिक धक्का बसला असून त्याच्यावर समुपदेशनाचे उपचार सुरू आहेत.