इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने लिहिलेल्या पुस्तकात २०१९ च्या वन डे विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंड-भारत साखळी सामन्याबाबत उल्लेख केला आहे. या सामन्यातील रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या तिघांच्या फलंदाजीबद्दल त्याने संशय व्यक्त केला. त्याच्या या पुस्तकावरून गेले काही दिवस पाकिस्तानचे काही माजी खेळाडू भारतीय संघ मुद्दाम इंग्लंडशी पराभूत झाला, असे आरोप करू लागले आहेत. बेन स्टोक्स याने, भारत मुद्दाम हरला असं म्हटलेलं नाही, असं ट्विट करून स्पष्ट केलं. तरीदेखील माजी कर्णधार वकार युनिस आणि माजी खेळाडू अब्दुल रझाक यांनी भारतीय संघातील खेळाडू मुद्दाम इंग्लंडपुढे नतमस्तक झाले असे मत व्यक्त केले आहे.

भारतीय समालोचक आकाश चोप्रा याने सणसणीत उत्तर दिले आहे. आकाश चोप्राने एक यु ट्यूब व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने आरोप करणाऱ्या माजी खेळाडूंचा चांगलाच समाचार घेतला आहे. “आज मी मुद्दामच लाज अजिबात दिसत नाही (शरम नॉट फाऊंड) असं लिहिलेला टी शर्ट घालून आलो आहे. (भारतीय संघावर आरोप करणाऱ्यांनी) आरोप करताना थोडासा विचार करायला हवा आणि थोडी लाज बाळगायला हवी. वकार युनिस, तू आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सदिच्छादूतांपैकी एक आहेस. तुझ्याकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अजिबातच अपेक्षा नाही”, असे तो म्हणाला.

“विराट आणि रोहित यांची भागीदारी तसेच महेंद्रसिंग धोनीची संथ खेळी या दोन्ही गोष्टी बेन स्टोक्सला संशयास्पद वाटल्या असतील हे जरी मान्य केलं तरी भारत सामना मुद्दाम हारलेला नाही, असं बेन स्टोक्सने अजिबात म्हटलेलं नाही. ICC ने अशाप्रकारची वक्तव्ये करणाऱ्या माजी खेळाडूंना दंड ठोठवला पाहिजे”, अशा भावना आकाश चोप्राने व्यक्त केल्या.

इंग्लंडने त्या सामन्यात ७ गडी गमावत ३३७ धावा केल्या होत्या, पण भारतीय संघाला हे आव्हान पेलवलं नाही. या दरम्यान सोशल मीडियावर उपांत्य फेरीत पाकिस्तानशी सामना होऊ नये व पुढील सामन्यात पाकिस्तानचे रन रेटचे गणित बिघडावे यासाठी भारत इंग्लंडविरुद्धचा सामना हारला अशी चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली होती.