हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर यांनी अखेरच्या षटकांपर्यंत मैदानात तळ ठोकत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात बाजी मारत, टी-२० मालिका खिशात घातली आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताकडे सध्या २-० अशी विजयी आघाडी आहे. अखेरच्या दोन षटकांत भारताला विजयासाठी २५ धावांची गरज असताना हार्दिकने तुफान फटकेबाजी करत सामन्याचं चित्रच पालटलं.

सिडनीच्या मैदानावर भारतीय संघाने केलेल्या या कामगिरीवर उद्योजक आनंद महिंद्रा चांगलेच खुश झाले आहेत. आयपीएलमुळे आपण टी-२० क्रिकेटचे मास्टर्स झालो आहोत. आपल्यासाठी भविष्यात टी-२० क्रिकेट हाच सर्वोत्तम प्रकार असणार असल्याचंही आनंद महिंद्रा म्हणाले…

१९५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारत सहज हार मानणार नाही हे स्पष्ट केलं. ५६ धावांची भागीदारी झाल्यानंतर अँड्रू टायने राहुलला माघारी धाडलं. यानंतर शिखर आणि विराटने पुन्हा एकदा जम बसवत भारताच्या डावाला आकार दिला. यादरम्यान शिखरने आपली फटकेबाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावलं. ही जोडी मैदानावर कमाल करणार असं वाटत असतानाच, झॅम्पाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात शिखर बाद झाला. त्याने ३६ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली.

फलंदाजीत बढती मिळालेल्या संजू सॅमनने काही चांगले फटके खेळत आश्वासक सुरुवात केली. परंतू हाराकिरी करत त्याने विकेट फेकत भारताच्या अडचणींमध्ये भर घातली. स्वेप्सनने सॅमसनचा बळी घेतला. यानंतर विराट कोहलीने पांड्याच्या साथीने सुरेख फटकेबाजी करत भारताचं आव्हान कायम ठेवलं. परंतू अखेरच्या षटकांमध्ये धावांचं आव्हान लक्षात घेता फटकेबाजी करण्याच्या नादात विराट डॅनिअल सम्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ४० धावांची खेळी केली. यानंतर मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली आणि भारताचं आव्हान कायम ठेवलं. अखेरच्या दोन षटकांत भारताला विजयासाठी २५ धावांची गरज होती. भारतीय फलंदाजांनी हे आव्हान सहज पूर्ण करत सामना खिशात घातला.