दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज एबी डिव्हीलियर्सने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करत डीव्हिलियर्सने आपण थकलो आहेत अशी कबुली देत आपल्या चाहत्यांना धक्का दिला. मैदानात ३६० अंशांमध्ये फटकेबाजी करणारा फलंदाज अशी ओळख असलेला डीव्हिलियर्स खऱ्या अर्थाने गोलंदाजांचा कर्दनकाळ मानला जायचा. रिव्हर्स स्विप, पॅडल स्विप, अपर कट यासारखे एकाहून एक सरस फटके खेळत डीव्हिलियर्स समोरच्या फलंदाजांना सळो की पळो करुन सोडत असे.

मैदानात स्वभावाने शांत असलेल्या डीव्हिल्यर्सची फलंदाजीतली कारकिर्द मात्र चांगलीच आक्रमक राहिलेली आहे. ३४ वर्षीय एबीडीने आतापर्यंत कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यांमध्ये मिळून तब्बल २० हजार १४ धावा पटकावल्या आहेत. त्याच्या कसोटी, वन-डे आणि टी-२० कारकिर्दीवर एक नजर टाकणार आहोत.

कसोटी – ११४,   धावा – ८७६५,   सर्वोच्च धावसंख्या – नाबाद २७८,   सरासरी – ५०.६६ ( २२ शतकं/४६ अर्धशतकं)

वन-डे – २२८,   धावा – ९५७७,   सर्वोच्च धावसंख्या – १७६,   सरासरी – ५३.५०  ( २५ शतकं/५३ अर्धशतकं)

टी-२० – ७८,   धावा – १६७२,   सर्वोच्च धावसंख्या – नाबाद ७९,   सरासरी – २६.१२   ( १० अर्धशतकं) 

१७ डिसेंबर २००४ साली डीव्हिलियर्सने इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केलं. यानंतर २ फेब्रुवारी २००५ सालात एबीडीने इंग्लंडविरुद्धच वन-डे सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पदापर्ण केलं. तर २४ फेब्रुवारी २००६ साली टी-२० क्रिकेटमध्ये एबीडीने आपला पहिला सामना खेळला. यानंतर आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर डीव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं कर्णधारपदही भूषवलं. मात्र आपल्या संघाला विश्वचषक मिळवून देण्यात तो अयशस्वी ठरला. त्याच्या निवृत्तीमुळे क्रिकेटप्रेमींना एक मोठा धक्का बसला असून, अनेकांनी डीव्हिलियर्सने लवकर निवृत्ती स्विकारली असं मत व्यक्त केलं आहे.