महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

६२व्या वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबाचा गतविजेता अभिजित कटके याने गादी गटात सोलापूरच्या रवींद्र शेंडगे याचा पराभव करून महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

कटके याने गादी गटातील सुवर्णपदक पटकावले आहे. आता अभिजित कटके याची महाराष्ट्र केसरी पदासाठी अंतिम लढत माती गटात सुवर्ण पदक मिळविणाऱ्या बाळा रफिकशी होणार आहे. रविवारी स्पर्धेचा शेवटचा दिवस असून यादिवशी महाराष्ट्र केसरी पदासाठी अंतिम लढत होणार आहे.

जालना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत शनिवारी ७१ किलो माती गटात सोलापूरच्या ओंकार दिरंगे, नांदेडच्या हनुमंत शिंदे, मुंबई पश्चिमच्या चैतन्य पाटील आणि धुळ्याच्या जतिन आव्हाळे यांनी विजय मिळवले. ७४ किलो गादी गटात, नाशिकचा हर्षवर्धन सदगिर, जळगावचा अतुल पाटील, अहमदनगरचा विष्णू खोसे आणि पिंपरी-चिंचवडच्या प्रमोद मांडेकर यांनी विजय प्राप्त केले.

स्पर्धेच्या ठिकाणी वादानंतर गोंधळ

मूळ सोलापूर जिल्ह्य़ातील एका मल्लाने मुंबईकडून स्पर्धेत भाग घेतल्याचा आक्षेप जालना येथील एका मल्लाने नोंदविला. त्यामुळे त्या मल्लास अपात्र ठरविण्यात आले. या निर्णयामुळे स्पर्धेच्या ठिकाणी वादावादी झाली आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही मल्लांनी मैदानातच बैठक मारली. त्यामुळे काही काळ स्पर्धा थांबली होती. तसेच अभिजित कटके आणि गणेश जगताप यांच्यात झालेल्या कुस्तीच्या वेळी पंचांनी भेदभाव केल्याचा आरोप पुण्याच्या काका पवार तालिम संघाच्या प्रशिक्षकांनी केला. पंच पक्षपाती भूमिका घेत असून काही जणांनी मल्लांसोबत धक्काबुक्की केल्याचाही आरोप करण्यात आला. या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर पंचही कुस्तीचे मैदान सोडून निघून गेले होते.