चीनला शह देण्यासाठी माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा कानमंत्र
सध्याच्या घडीला बॅडमिंटन खेळामध्ये चीनचे वर्चस्व पाहायला मिळते. त्यांच्याशी स्पर्धा करताना अन्य देशांतील खेळाडू मागे पडतात. पण जर चीनला शह द्यायचा असेल तर भारतातील प्रत्येक राज्यात अकादमी असायला हवी, असा कानमंत्र भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी दिला आहे.
भारतामध्ये सध्याच्या घडीला फक्त दोनच मोठय़ा अकादम्या आहेत. यामध्ये वीस वर्षे जुन्या प्रकाश पदुकोण अकादमीचा समावेश आहे. ही अकादमी बंगळुरू येथे आहे. भारताचे माजी बॅडमिंटनपटू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची हैदराबादमध्ये अकादमी आहे. त्याचबरोबर लखनऊमध्येही एक अकादमी उभारण्यात आली आहे.
‘‘भारताला जर चीनशी स्पर्धा करायची असेल तर भारतामध्ये ३० अकादमींची आवश्यकता आहे. प्रत्येक राज्यामध्ये किमान एक तरी अकादमी असायला हवी आणि त्या अकादमीमध्ये पूर्णपणे खेळाला समर्पित असलेले प्रशिक्षक असायला हवेत, जे खेळाडूंकडून चांगली मेहनत करून घेतील आणि देशाला चांगले बॅडमिंटनपटू मिळतील,’’ असे पदुकोण यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘भारताच्या प्रत्येक राज्यांमध्ये गुणवान खेळाडू आहेत, पण तेवढय़ा अकादमी भारतात नाहीत. उत्तर भारतामध्ये एकही चांगली अकादमी नसून त्यांना प्रशिक्षणासाठी लखनऊला यावे लागते. त्याचबरोबर भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्याही (साइ) देशामध्ये सहा विभागांमध्ये अकादमी आहेत. त्यांनी बराच पैसा विदेशी प्रशिक्षकांवर खर्च केला आहे. साइकडेही चांगले प्रशिक्षक आहेत, पण त्यांनी गुणवान युवा खेळाडूंना हेरून त्यांना योग्य मार्गदर्शन करायला हवे.’’
साइच्या सहा विभागांमधील अकादमींनी अन्य अकादमींना गुणवान खेळाडू हेरून पाठवायला हवेत, त्याचबरोबर हैदराबाद आणि लखनऊ या अकादमींना राष्ट्रीय स्तराचा दर्जा द्यायला हवा, असे पदुकोण यांना वाटते.
‘‘साइच्या अकादमींमधील प्रशिक्षकांचे मुख्य काम गुणवत्ता हेरण्याचे आहे. त्यानंतर त्यांनी या गुणवान खेळाडूंना बंगळुरू, हैदराबाद किंवा लखनऊ येथील अकादमींमध्ये पाठवायला हवे. हाच यशस्वी खेळाडू घडवण्याचा योग्य मार्ग आहे,’’ असे पदुकोण यांनी सांगितले.
भारतामध्ये युवा बॅडमिंटनपटूंची खाण असल्याचे पदुकोण सांगतात. याबाबत ते म्हणाले की, ‘‘भारतामध्ये कनिष्ठ स्तरावर भरपूर गुणवान खेळाडू आहेत. त्यांच्या कामगिरीचा आलेखही उंचावत जात आहे. खासकरून युवा मुलांच्या गटामध्ये भरपूर गुणवत्ता पाहायला मिळत आहे. पण त्यांना यापुढे योग्य मार्गदर्शन मिळायला हवे.’’
अन्य देशांबद्दल पदुकोण म्हणाले की, ‘‘भारतातील बॅडमिंटनचा दर्जा अजूनही उंचावायला हवा. स्पेन, फ्रान्स, जर्मनी आणि नेदरलँड्ससारख्या देशांच्या ताफ्यात जास्त खेळाडू दिसत नाहीत. या देशांतील राष्ट्रीय संघटनांना आर्थिक गोष्टींची गरज आहे. अमेरिकेसारखा देश विश्व अजिंक्यपद स्पर्धा घेण्यासाठी आतुर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये स्पर्धाचा दर्जा उंचावलेला असला तरी जास्त खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसत नाहीत. आर्थिक चणचण हा बऱ्याच देशांपुढील मोठी समस्या आहे.’’
‘बॅडमिंटन लीगमध्ये सातत्य हवे’
प्रीमियर बॅडमिंटन लीगचा खेळाला नक्कीच फायदा होईल, पण या स्पर्धेमध्ये सातत्य असायला हवे. या लीगमुळे खेळाचा चांगला प्रचार आणि प्रसार झाला आहे, पण गेल्या दोन वर्षांमध्ये ही लीग होऊ शकली नव्हती. माझ्या मते ही लीग सातत्याने झाल्यास त्याचा फायदा भारताला नक्कीच होईल. यासाठी संघटनांनीही पुढाकार घ्यायला हवा.