काळाची गरज लक्षात घेऊन बुद्धिबळ या खेळासाठी मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे अशा तीन जिल्हय़ांसाठी कार्यरत असलेल्या एकाच संघटनेचे त्रिभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे या तीन जिल्हय़ांतील खेळाडूंपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी येत असलेल्या अडचणी दूर झाल्या आहेत. प्रत्येक जिल्हय़ात स्वतंत्र संघटना
तयार झाल्याने खेळाडूंसाठी ‘अच्छे दिन’ आले असे म्हणायला हरकत नाही़
देशात बुद्धिबळ खेळाचा प्रसार आणि प्रचार व्हावा याकरिता प्रत्येक जिल्हय़ात संघटना उभारावी, अशी सूचना अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाकडून (एआयसीएफ) देण्यात आली. त्याअनुसार मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे अशा तीन जिल्हय़ांची मिळून एकच संघटना असलेल्या मुंबई बुद्धिबळ असोसिएशनचे (बॉम्बे चेस असोसिएशन) त्रिभाजन करण्यात आले. तीन जिल्हय़ांत संघटना उभी राहिल्यामुळे त्या-त्या जिल्हय़ांतील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळणार असल्याची प्रतिक्रिया आता बुद्धिबळ क्षेत्रातून उमटत आहे.
‘‘तीन जिल्हय़ांची मिळून एकच संघटना असल्याने राज्यस्तरीय स्पर्धामध्ये केवळ दोनच खेळाडूंना या संघटनेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायची. मात्र, आता त्रिभाजन झाल्यामुळे प्रत्येकी दोन अशा सहा खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धामध्ये खेळता येणार आहे. खेळाच्या विकासासाठी आणि खेळाडूंच्या प्रगतीसाठी हे चांगले संकेत आहेत,’’ असे मत मुंबई उपनगर संघटनेचे पदाधिकारी विठ्ठल माधव यांनी व्यक्त केले.
‘‘मिळालेल्या संधीतून खेळाडूही आपापल्या कामगिरीचा आलेख चढा ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहतील,’’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पूर्वी मुंबईतल्या स्पर्धामध्ये ठाण्यातील खेळाडू येण्यास फारसा रस दाखवत नव्हते. वेळेचा दुरुपयोग आणि होणारी दगदग टाळण्यासाठी ते स्पर्धामध्ये सहभाग घेण्यास टाळाटाळ करायचे, परंतु आता ठाणे जिल्हय़ातच विविध स्पर्धाचे आयोजन होऊ लागल्यामुळे तेथील हौशी आणि नवशिखे खेळाडूही मोठय़ा संख्येने स्पर्धामध्ये सहभाग घेत असल्याचे चित्र आह़े.

पण, समस्याही वाढल्या..
त्रिभाजनामुळे खेळाडूंना व्यासपीठ मिळाले असले तरी स्पर्धा आयोजनाचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या खेळाला प्रायोजक मिळत नसल्याने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच स्पर्धाचे आयोजन करण्यात येत होते. मात्र, आता त्रिभाजनामुळे प्रत्येक जिल्हय़ात विविध वयोगटांसाठी स्पर्धा आयोजन करणे आणखी कठीण झाले आहे. प्रायोजक शोधण्यासाठी संघटकांना अनेकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत आणि दिवसाअंती हाती काही मिळेल, याची शाश्वतीही त्यांना नसते.