क्रिकेटमध्ये कर्णधाराइतकाच महत्त्वाचा असतो तो यष्टीरक्षक. यष्टीरक्षक हा फलंदाजाच्या मागे उभा असतो. तिथून त्याला संपूर्ण मैदाना दिसत असतं. त्यामुळे फलंदाजाची शैली पाहून यष्टीरक्षक कर्णधाराला फिल्डिंग लावण्यासाठी चांगलं सहकार्य करू शकतो. त्यातच कर्णधार स्वत:च यष्टीरक्षक असेल तर त्याची कारकीर्द यशस्वी ठरते. महेंद्रसिंग धोनी, कुमार संगाकारा ही त्यांची उदाहरणं आहेत. पण काही खेळाडू कर्णधार नसूनही आपल्या संघाचं विकेट किपिंग करताकरता नेतृत्व करतात. ऑस्ट्रेलियाचा गिलक्रिस्ट हा त्यातलाच एक. त्याने यष्टीरक्षक म्हणून तर आपली कारकिर्द घडवलीच पण तुफान फटकेबाजी करत फलंदाज म्हणूनही नाव कमावलं. या गिलक्रिस्टने नुकताच त्याला आवडणारा यष्टीरक्षक कोण हे सांगितलं आहे.

“माझा आवडता यष्टीरक्षक हा नक्कीच धोनी आहे. संगाकारा, मक्क्युलम हे नक्कीच दर्जेदार यष्टीरक्षक आहेत. पण मला मात्र सर्वाधिक धोनीच आवडतो. त्याची कारकिर्द हेच त्याचे कारण आहे. बाऊचर हादेखील एक चांगला यष्टीरक्षक होता. पण डोळ्याच्या गंभीर दुखापतीमुळे त्याची कारकीर्द लवकर संपली हे त्याचं दुर्दैव”, असे गिलक्रिस्ट लाइव्ह कनेक्ट कार्यक्रमात बोलताना म्हणाला.

“धोनीची कारकीर्द विकसित होताना पाहायला मला खूप आवडली. त्याने प्रचंड मेहनत घेत चांगली कामगिरी केली. भारतासारख्या देशात क्रिकेटपटूंकडून खूप अपेक्षा असतात. त्या अपेक्षांची पूर्तता त्याने केली, त्यामुळेच त्याला भारतीयांचे प्रेम मिळालं. त्याने स्वत:ची कारकीर्द ज्या पद्धतीने घडवली ती बाब उल्लेखनीय आहे. मैदानावरील त्याची शांत आणि संयमी भूमिका त्याच्या कारकिर्दीसाठी मदतीची ठरली. भारतीय क्रिकेटमधील त्याचं योगदान दीर्घकाळ चाहत्यांच्या स्मरणात राहिल”, असेही गिलक्रिस्ट म्हणाला.