विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला अलेखाइन स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्याच फेरीत इंग्लंडच्या मायकेल अ‍ॅडम्सकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. चीनच्या डिंग लिरेन याने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियन याला पराभूत करून थाटात सुरुवात केली.
पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना आनंदने रूय लोपेझ पद्धतीने डावाला सुरुवात केली. पण अ‍ॅडम्ससारख्या बलाढय़ प्रतिस्पध्र्याने सुरुवातीलाच आनंदचे दोन्ही हत्ती मिळवत लढतीवर पकड मिळवली. आनंदने प्याद्यांच्या साहाय्याने बचाव करण्याचा प्रयत्न केला. अखेर ५६व्या चालीनंतर आनंदला पराभवाचा सामना करावा लागला. १० बुद्धिबळपटूंच्या राऊंड-रॉबिन पद्धतीनुसार होणाऱ्या या स्पर्धेत रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिक याने रशियाच्या निकिता विटुइगोव्ह याला हरवत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.