युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या यशस्वी जैस्वालने त्याच्या यशाचे रहस्य उलगडले आहे. विश्वचषकापूर्वी भारतात अ‍ॅस्ट्रो-टर्फ खेळपट्टय़ांवर केलेल्या सरावाचा फायदा दक्षिण आफ्रिकेत उसळत्या चेंडूंना साथ देणाऱ्या खेळपट्टय़ांवर झाला, असे जैस्वाल याने म्हटले आहे.

युवा विश्वचषकात सहा सामन्यांत ४०० धावा करणारा जैस्वाल म्हणतो की, ‘‘माझे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी विश्वचषकापूर्वीच तुला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचे बक्षीस मिळवायचे आहे असे म्हटले होते. त्या दृष्टीने त्यांनी उसळत्या चेंडूंना साथ देणाऱ्या खेळपट्टय़ांवर माझी तयारी करून घेतली. आखूड टप्प्याचे चेंडू कसे टोलवायचे याचा केलेला सराव मला उपयोगी पडला.’’

‘‘आखूड टप्प्याचे चेंडू मी खेळायचो किंवा सोडून द्यायचो. अ‍ॅस्ट्रो-टर्फ खेळपट्टय़ांवर नेहमीच उसळत्या चेंडूंना साथ मिळते. ज्वाला सरांनी त्या दृष्टीने माझ्याकडून तयारी करून घेतली,’’ असे १८ वर्षीय जैस्वाल म्हणाला. जैस्वालने त्याचा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार त्याचे प्रशिक्षक ज्वाला यांना समर्पित केला. ‘‘दुसऱ्या देशात खेळण्याचा अनुभव खूप चांगला होता. कारण खेळपट्टय़ाही वेगळ्या असतात. सामन्यात आणि सरावादरम्यान मी अधिक काळ फलंदाजी केली त्याचा फायदाच झाला. दडपणाला कसे सामोरे जायचे हेदेखील शिकायला मिळाले,’’ असे जैस्वालने सांगितले.

जैस्वालने त्याचा भारताच्या युवा संघातील सलामीचा सहकारी दिव्यांश सक्सेनाबद्दलही कौतुकोद्गार काढले. दिव्यांश आणि जैस्वाल हे दोघेही मुंबईतील ‘दादर युनियन’ या क्लबकडून क्रिकेट खेळून पुढे आले होते. ‘‘काही वेळेला मी मोठे फटके खेळण्याचा धोका पत्करत असे. मात्र दिव्यांश मला सावध सूचना करत अजून खेळात बराच वेळ बाकी आहे याची आठवण करायचा,’’ याकडे जैस्वालने लक्ष वेधले.