अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असगर अफगाणने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. तो आता धोनीबरोबर सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा कर्णधार बनला आहे. कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत 41 आंतरराष्ट्रीय टी -20 सामने जिंकले आहेत.

असगर अफगाणची कर्णधार म्हणून आतापर्यंत कामगिरी चांगली आहे. त्याने आतापर्यंत 51 सामन्यांत अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे आणि 41 सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानला केवळ 9 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर एक सामना अनिर्णित सुटला आहे.

धोनीची कामगिरी

कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीने 72 सामन्यांत 41 विजय मिळवले आहेत. तर, 28 सामन्यांमध्ये त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. यापैकी एक सामना बरोबरी सुटला असून, दोन सामने अनिर्णित राखले आहेत. धोनीने कर्णधार म्हणून 2007ची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होती.

या यादीत मॉर्गन दुसरा

इंग्लंडचा कर्णधार ईयॉन मॉर्गनने 33 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले असून, या यादीत तो दुसर्‍या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद 29 विजयांसह तिसऱ्या आणि वेस्ट इंडिजचा डॅरेन सॅमी 27 विजयांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

अफगाणिस्तानची झिम्बाब्वेवर मात

अबुधाबी येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बाब्वेला 45 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 193 धावांचे विशाल आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 17.1 षटकांत 148 धावा करू शकला.