भारताविरुद्ध बंगळुरू येथे होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात आयपीएलमध्ये फिरकीची जादू दाखवणारा रशीद खान याला संधी देण्यात आली आहे. रशीद खानने आयपीएलमध्ये विराट कोहली, महेंद्र सिंग धोनी यासारख्या मातब्बर फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवले होते. त्यामुळे या कसोटी सामन्यात आता रशीद खान विरुद्ध भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे.

१६ खेळाडूच्या या संघाचे कर्णधारपद असगर स्टानिकझाई याच्याकडे देण्यात आले आहे. १४ ते १८ जून दरम्यान हा कसोटी सामना रंगणार असून अफगाणिस्तानला कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यापासून अफगाणिस्तान प्रथमच भारताशी कसोटी सामना खेळणार आहे.

या संघात रशीदबरोबरच आणखी २ आयपीएलमधील खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. आयपीएलमध्ये मोहम्मद नबी हैदराबादकडून आणि मुजीब-उर-रहमान पंजाबकडून खेळला. त्यांनाही संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे भारतातील खेळपट्टीचा त्यांचा चांगलाच अंदाज असणार आहे. रशीदने आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने २१ बळी टिपले आणि १९०च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. मुजीबानेही सुरुवातीला चांगली कामगिरी केली, मात्र दुखापतीमुळे त्याला पुढील सामने खेळता आले नाहीत. तुलनेने नबी याला संपूर्ण आयपीएलमध्ये केवळ २ सामने खेळण्याची संधी मिळाली.

या संघात वेगवान गोलंदाज दौलत झादरान याला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावे लागणार आहे. या सामन्याच्या तयारीसाठी अफगाणिस्तानच्या संघाबरोबर तो डेहराडून येथे सराव करत होता. त्यावेळी त्याला दुखापत झाली आणि त्याला संघाबाहेर व्हावे लागले आहे.

अफगाणिस्तानचा संघ – असगर स्टानिकझाई (कर्णधार), जावेद अहमदी, इहसानुल्ला जन्नत, रहमत शहा, नासीर जमाल, हसमतुल्लाह शाहीदी, अफसर जाझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, जहीर खान, हामजा होताक, सैद शेहरझाद, यामीन अहमदझाई, वफादार मोमांद, मुजीब-उर-रहमान

दरम्यान, या सामन्यासाठी विराट कोहलीच्या जागी अजिंक्य रहाणेकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे. विराट हा आक्रमक खेळाडू आहे, तर रहाणे हा शांत आणि संयमी खेळाडू आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या फिरकीसमोर भारत कोणती नीती वापरणार, हे पाहणेही औत्स्युकाचे ठरणार आहे.