दुखापतीमुळे डेल स्टेनने घेतलेली माघार, प्रमुख वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी अद्यापही जायबंदी आणि सलगच्या तीन पराभवांमुळे दक्षिण आफ्रिकेचे यंदाच्या विश्वचषकातील आव्हान डळमळीत झाले आहे. पहिल्यावहिल्या विजयासाठी दक्षिण आफ्रिका संघ उत्सुक असला तरी सोमवारी साऊदम्पटनच्या रोज बाऊल स्टेडियमवर होणाऱ्या धोकादायक वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्यांना अस्तित्वाची लढाई द्यावी लागणार आहे.

फॅफ डय़ू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने स्टेनच्या जागी ब्युरने हेंड्रिक्सला स्थान दिले असून एन्गिडीच्या समावेशाविषयी अद्यापही साशंकता व्यक्त केली जात आहे. कामगिरीत सातत्य नसल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या चिंता आणखीनच वाढल्या आहेत. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर सलामीवीरांना चमक दाखवावी लागेल. उद्घाटनाच्या सामन्यात इंग्लंडकडून १०४ धावांनी पराभूत झाल्यानंतर बांगलादेशनेही पुढील सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का दिला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताकडून सलग तिसरा पराभव पत्करल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला आपला ‘कचखाऊ’ शिक्का पुसून काढण्यासाठी आता अधिक मेहनत घ्यावी लागेल.

दुसरीकडे, वेस्ट इंडिजने आतापर्यंत या स्पर्धेत संमिश्र कामगिरी केली आहे. आपल्या वेगवान माऱ्यासमोर पाकिस्तानला अवघ्या १०५ धावांवर गुंडाळत वेस्ट इंडिजने सहज विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांनी चमक दाखवली होती. मात्र विजयाच्या स्थितीत असतानाही अखेरच्या क्षणी फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते. वेस्ट इंडिजच्या या गोलंदाजीची तुलना ८०च्या दशकातील वेगवान माऱ्याशी केली जात आहे. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाजी कमकुवत झाली असून वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजांसमोर त्यांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात वेस्ट इंडिजचे पारडे जड मानले जात आहे.

आफ्रिकेचे फलंदाज अपयशी

सलामीच्या सामन्यात क्विंटन डी’कॉकने तर बांगलादेशविरुद्ध कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसने अर्धशतक झळकावले होते. ते वगळता दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना आतापर्यंत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. डी’कॉक, रास्सी व्हॅन डर डुसेन, हशिम अमला हे फलंदाज सपेशल अपयशी ठरले आहेत. आफ्रिकेच्या फलंदाजांना वैयक्तिक तीन आकडी धावसंख्या उभारावी लागेल.

वेस्ट इंडिजची तगडी फलंदाजी

सलामीवीर ख्रिल गेल बहरात आला असून शाय होपने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावत टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. इविन लुइस काहीसा अपयशी ठरला असला तरी त्याची जागा आता डॅरेन ब्राव्हो घेण्याची शक्यता आहे. निकोलस पूरन, शिम्रॉन हेटमायर आणि कर्णधार जेसन होल्डर उपयुक्त योगदान देत असून आक्रमक फलंदाजीची मदार आंद्रे रसेल आणि कालरेस ब्रेथवेट यांच्यावर आहे.

सामना क्र. १५

दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज

स्थळ : रोज बाऊल, साऊदम्पटन  ’सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २,

स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १.

संघ

दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू  प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक), जेपी डय़ुमिनी, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, लुंगी एन्गिडी, ब्युरन हेंड्रिक्स, कॅगिसो रबाडा, इम्रान ताहिर, ताबारेझ शम्सी, अँडीले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, व्हॅन डर डुसेन.

वेस्ट इंडिज: जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, इव्हिन लेविस, शाय होप, डॅरेन ब्राव्हो, शिम्रॉन हेटमायर, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, कालरेस ब्रॅथवेट, फॅबिअन अ‍ॅलन, अ‍ॅश्ले नर्स, श्ॉनन गॅब्रिएल, शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस, केमार रोच.

आमनेसामने

एकदिवसीय   

सामने : ६१, दक्षिण आफ्रिका : ४४,

वेस्ट इंडिज : १५, टाय / रद्द : १/१

विश्वचषकात    

सामने : ६, दक्षिण आफ्रिका : ४,

वेस्ट इंडिज : २, टाय / रद्द : ०

खेळपट्टीचा अंदाज

वातावरणात गारवा असला तरी दुपारच्या क्षणी पावसाची शक्यता नाकारता येत नाही. द रोज बाऊल स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी पोषक असल्यामुळे धावांची बरसात होण्याची शक्यता आहे. मात्र याच खेळपट्टीवर बुमरा आणि चहल यांनी वर्चस्व गाजवले होते.