वेस्ट इंडिजचा अनुभवी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. काही महिन्यांपूर्वी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने संघात तरूण खेळाडुंना प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबले होते. या पार्श्वभूमीवर चंद्रपॉलकडून निवृत्तीचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून क्रिकेटमधील अमूल्य योगदानाबद्दल चंद्रपॉलचे आभार मानण्यात आले आहेत.
तब्बल २२ वर्षे वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या चंद्रपॉलने १९९४ मध्ये इंग्लडविरुद्धच्या सामन्याद्वारे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने १६४ कसोटी सामन्यांमध्ये ५१.३७च्या सरासरीने ११,६८७ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३० शतके आणि ६६ अर्धशतके जमा आहेत. याशिवाय, चंद्रपॉलने २६८ एकदिवसीय सामन्यांमध्ये विंडीजच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. या सामन्यांमध्ये त्याने ४१.६०च्या सरासरीने ८,७७८ धावा केल्या. क्रिकेटविश्वात चंद्रपॉल फलंदाजीच्या विचित्र शैलीसाठीदेखील प्रसिद्ध होता.