क्रिकेटमध्ये बुधवारी पाकिस्तानचा फलंदाज अझहर अली हा अत्यंत हास्यास्पद पद्धतीने धावचीत झाला. चेंडू नक्की किती लांब गेला हे न समजल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला आणि अली बाद झाला. ही घटना ताजी असतानाच आज असाच एक वेंधळा प्रकार पाहायला मिळाला. हा धावबाद झालेला व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ आंतरराष्ट्रीय सामन्यातील नसून एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील आहे. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या प्लंकेट शिल्ड (Plunket Shield) स्पर्धेत वेलींग्टन आणि ओटॅगो यांच्यात सामना सुरु होता. या सामन्यातील हा व्हिडीओ आहे. दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात हा मजेशीर धावचीत झाला. दोन्ही फलंदाज एकूण तीन वेळा पाय घसरून खेळपट्टीवर पडले आणि अखेर एक जण धावबाद झाला, असा हा व्हिडीओ आहे.

 

सामन्यातील ४७व्या षटकात मायकल रिपोन याने चेंडू फ्लिक केला आणि दोन्ही फलंदाज धावा काढण्यासाठी पळाले. या दरम्यान दुसरी धाव घेताना आधी नॅथन स्मिथ दोन वेळा खेळपट्टीवर घसरला. त्यानंतर मायकल रिपोनदेखील पाय घसरून पडला. याचा फायदा घेत यष्टीरक्षकाने स्टंप उडवला आणि फलंदाज बाद झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर चित्रविचित्र कमेंटही केल्या.