वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वडिलांच्या निधनामुळे मायदेशात परतण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु राष्ट्रीय कर्तव्यासाठी ऑस्ट्रेलियातच थांबण्याचा निर्णय त्याने घेतला आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी दिली.

‘‘फुप्फुसांच्या आजारामुळे सिराजच्या वडिलांचे शुक्रवारी निधन झाले. याबाबत ‘बीसीसीआय’ने त्याच्याशी चर्चा केली. त्याच्यासमोर भारतात परतण्याचा पर्याय ठेवण्यात आला. मात्र त्याने भारतीय संघासमवेत राहण्याचा निर्णय स्पष्ट केला,’’ असे शाह यांनी सांगितले. कठीण प्रसंगातही देशहिताला प्राधान्य देणाऱ्या सिराजचे ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीने ‘ट्विटर’द्वारे कौतुक केले.

वडिलांनी रिक्षा चालवून सिराजचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न साकारले. मागील रणजी हंगामात हैदराबादकडून ४१ बळी घेतल्यामुळे तो प्रकाशझोतात आला. त्यामुळे दोन कोटी ६० लाख रुपये अशी बोली लावत त्याला सनरायजर्स हैदराबादने संघात स्थान दिले. सिराजची चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.