‘‘भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या निर्भयपणाचा परिणाम इशांत शर्मावर झाला आणि म्हणूनच त्याने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत आक्रमकतेची परिसीमा ओलांडली,’’ असे मत इशांतच्या बालपणीचे प्रशिक्षक श्रावण कुमार यांनी व्यक्त केले.

‘‘इशांतने चांगली गोलंदाजी केली, परंतु तो अधिक आक्रमक झाला. त्याला हे टाळायला हवे होते. जोपर्यंत प्रतिस्पर्धी खेळाडू हातापाईवर किंवा शिवीगाळीवर येत नाही, तोपर्यंतचा आक्रमकपणा स्वीकार्ह आहे. मात्र, ही सीमा तुम्ही ओलांडत असाल, तर तुम्हाला शिक्षा व्हायलाच हवी. इशांत सोबतही तेच घडले,’’ असे श्रावण यांनी सांगितले.
श्रवण यांनी इशांतच्या या आक्रमकतेला कर्णधार कोहलीला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, ‘‘कोहलीच्या अति आक्रमकपणामुळे इशांतकडून असा गैरप्रकार घडला. निर्भयपणाने खेळ करण्यावर कोहलीचा विश्वास आहे आणि तसेच वातावरण ड्रेसिंग रूममध्ये होते. त्याचा इशांतवरही परिणाम झाला. त्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घाताली गेली. निर्भयतेचा अर्थ म्हणजे गैरवर्तणूक करणे असे होत नाही.’’