भारतीय संघातील मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने क्रिकेट विश्वात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. रहाणेने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षणाचा अप्रतिम नमूना पेश करीत आतापर्यंत आठ झेल टिपले आहेत. त्यामुळे एकाच कसोटीत सर्वाधिक झेल टिपणारा खेळाडू म्हणून अजिंक्य रहाणेच्या नावाची नोंद झाली आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्या नावावर होता. चॅपल यांनी एकाच कसोटीत ७ झेल टिपले होते. चॅपेल यांचा विक्रम मोडीत काढून अजिंक्यने श्रीलंकेच्या आठ फलंदाजांचे झेल टिपले. अजिंक्यने टिपलेल्या आठ झेलांपैकी काही झेल टिपणे कठीण होते. हे झेल टिपून रहाणेने आपल्या  क्षेत्ररक्षणातील कसब सिद्ध करून दाखवले आहे. दरम्यान, कसोटीच्या दुसऱया डावात श्रीलंकेचा डाव ३६७ धावांत आटोपला असून भारतासमोर कसोटी विजयासाठी १७६ धावांचे लक्ष्य आहे.