दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात विराटची जादू कायम असली तरी उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा फॉर्म भारतीय संघाची चिंता वाढवणारा असाच आहे. भारताच्या मध्यफळीतील मदार सांभाळण्याची क्षमता सिद्ध केल्यानंतर सद्यपरिस्थितीत अजिंक्य रहाणे अपयशी ठरताना दिसत आहे. मागील ११ सामन्यात रहाणेची कामगिरी खालावल्याचे दिसत आहे. ११ सामन्यातील १७ सामन्यात रहणेनं ३६.२० च्या सरसरीनं केवळ ५४३ धावा केल्या आहेत. यात ३ शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. रहाणेची ही आकडेवारी भारतीय क्रिकेटप्रेमींना अस्वस्थ करणारी अशीच आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत रहाणे सपशेल अपयशी ठरला आहे. या मालिकेत आतापर्यंत तीन डावात त्याने अवघ्या ७ धावा केल्या आहेत. त्यात ४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने या ४ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात तो चार चेंडू खेळला आणि शून्यावर बाद झाला. नागपूरमधील दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात रहाणेनं दोन धावा केल्या होत्या. तर दिल्लीच्या मैदानात त्याला केवळ १ धाव करता आली. नागपूरच्या मैदानात शतकी खेळी करणाऱ्या मुरली विजयचे शतक आणि विराट कोहलीची दमदार खेळी याच्या जोरावर भारताने या सामन्यात मोठी धावसंख्या उभारली आहे. त्यामुळे या मालिकेत आता रहाणेला मैदानात उतरण्याची संधी पुन्हा मिळण्याची शक्यता धुसर आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. रहाणेच्या खराब कामगिरीमुळे निवड समितीची चिंता निश्चितच वाढली आहे. आगामी दौऱ्यावर रहाणेसारखा फलंदाज फॉर्ममध्ये नसणे भारतासाठी फायदेशीर मुळीच नाही. या दौऱ्यात भारतीय संघ पाच गोलंदाजासह मैदानात उतरल्यास अजिंक्यऐवजी रोहित शर्माचा पर्याय संघासमोर असेल. रोहित शर्माची कामगिरी पाहता प्लेइंग इलेव्हनमधील स्थान पक्के करण्याच त्याला सहज सोपे आहे. मात्र, रहाणेची परदेशातील कामगिरी त्याच्यासाठी लाभदायक ठरू शकते. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रहाणेनं कमालीची कामगिरी केली होती. दोन सामन्यातील ४ डावात त्याने ६९.६६ च्या सरासरीनं २०९ धावा केल्या होत्या. यामध्ये ९६ ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती. या कामगिरीचा निवड समिती नक्कीच विचार करेल.