पदार्पणातच सोनेरी कामगिरी करणारा चौथा युवा भारतीय नेमबाज

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा

भारताचा युवा खेळाडू अखिल शेरॉनने मेक्सिकोत सुरू असलेल्या विश्वचषक चषक नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर थ्री पोझिशनमध्ये ‘सुवर्णवेध’ घेत कौतुकास्पद कामगिरी केली. पदार्पणातच सोनेरी कामगिरी करणारा तो चौथा युवा भारतीय नेमबाज ठरला आहे.

शाहझार रिझवी, मनू भाकेर, मेहुली घोष आणि अंजूम मुडगिल यांच्या कामगिरीमुळे आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारत प्रथमच गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. शेरॉनने अंतिम फेरीत ४५५.६ गुण मिळवताना ऑस्ट्रियाच्या बर्नार्ड पिकेलवर मात केली. बर्नार्डने ४५२ गुणांची नोंद केली. या क्रीडाप्रकारात हंगेरीचा अनुभवी खेळाडू पीटर सिदी, रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता अ‍ॅलेक्सी रिनॉल्ड (फ्रान्स), एअर रायफल सुवर्णपदक विजेता इस्तव्हान पेनी व भारताचा राष्ट्रीय विजेता संजीव रजपूत यांचा समावेश होता. या सर्वाना मागे टाकून शेरॉनने सनसनाटी कामगिरी केली. पात्रता फेरीत पेनीने ११७८ गुणांसह प्रथम स्थान घेतले होते, तर रजपूत ११७६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. शेरॉन (११७४) व स्वप्निल कुसळे (११६८) हे भारतीय खेळाडू अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर होते. भारताच्याच तीन स्पर्धकांनी अंतिम फेरीत स्थान मिळवल्यामुळे खूप उत्सुकता निर्माण झाली होती. चुरशीच्या अंतिम फेरीत शेरॉनने शेवटच्या नेमच्या वेळी १०.८ गुणांची नोंद करीत सोनेरी यश खेचून आणले. रजपूतचे कांस्यपदक थोडक्यात हुकले.

नेमबाजीतील भारताचे भवितव्य योग्य युवा खेळाडूंच्या हातात गेले असल्याचे पाहून समाधान वाटत आहे. अखिलने अनेक अव्वल दर्जाच्या खेळाडूंवर मात केली आहे. भारतीय नेमबाजांनी अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करीत ऑलिम्पिकमध्ये पदके कशी मिळवता येतील याकडे लक्ष द्यावे.

-अभिनव बिंद्रा, आंतरराष्ट्रीय नेमबाज