एखादी गोष्ट अवघड असू शकते, पण अशक्य नाही, याचाच प्रत्यय अष्टपैलू अक्षर पटेलने वानखेडेवर सोमवारी साऱ्यांना दिला. बिनीचे फलंदाज माघारी परतले असले तरी एकाकी झुंज देत त्याने धुवाँधार अर्धशतकी खेळीच्या जोरावर देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभागाला दक्षिण विभागावर दोन विकेट्स आणि १७ चेंडू राखून विजय मिळवून दिला. या विजयासह पश्चिम विभागाने अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला असून त्यांच्यापुढे पूर्व विभागाचे आव्हान असेल.
शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिलास तर विजय आपलाच होणार, हे प्रशिक्षकांचे बोल त्याच्या कानात सतत घुमत होते. त्यामुळेच दक्षिण विभागाच्या ३१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आत्मघातकी फटके मारून पश्चिम विभागाचे फलंदाज बाद होत असले तरी अक्षरने विजयी पताका फडकावूनच मैदान सोडले.
३१५ धावांचा पाठलाग करताना शेल्डन जॅकसन (५१) आणि अंबाती रायुडू (५४) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली, पण हे दोघेही अर्धशतक झळकावल्यावर झटपट तंबूत परतले. त्यानंतर युसूफ पठाणला (२) विनय कुमारने अप्रतिमपणे आपल्या जाळ्यात ओढत माघारी धाडले. दक्षिण विभाग विजय मिळवणार असे वाटत असतानाच सूर्यकुमार यादव आणि अक्षर यांनी सातव्या विकेटसाठी जलदगतीने ७० धावांची भागीदारी रचत दक्षिणेच्या तोंडातील विजयाचा घास हिरावून आणण्याचा प्रयत्न केला. ९ आणि ११ धावांवर जीवदान मिळालेल्या सूर्यकुमारने जलद अर्धशतक झळकावत शतकाच्या दिशेने कूच केली.
स्टुअर्ट बिन्नीला ३९व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकल्यावर त्यानंतरच्या चेंडूवरही मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमारने आत्मघात केला. सूर्यकुमारने ५६ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ८० धावांची खेळी साकारली. तिसऱ्या ‘पॉवर प्ले’मध्ये पश्चिम विभागाने सूर्यकुमारच्या विकेटच्या मोबदल्यात ६७ धावा फटकावल्या.
सूर्यकुमार बाद झाल्यावर अक्षरने सामन्याची सूत्रे हातात घेत दक्षिण विभागावर चौफेर हल्ला चढवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यावेळी त्याने शार्दूल ठाकूरच्या (नाबाद ३१) मदतीने नवव्या विकेटसाठी ५० धावांची अभेद्य भागीदारी रचली.
२३ धावांची गरज असताना शार्दूलने ४७व्या षटकात प्रत्येकी दोन चौकार आणि षटकार लगावत संघासाठी विजय सुकर करून दिला. अक्षरने या वेळी धडाकेबाज फलंदाजी करत ३८ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर नाबाद ६४ धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला.
त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना दक्षिण विभागाने मयंक अगरवाल (८६), बाबा अपराजित (५६) आणि मनीष पांडे (५५) यांच्या खेळींच्या जोरावर सात फलंदाजांच्या मोबदल्यात ३१४ धावा फटकावल्या.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण विभाग : ५० षटकांत ७ बाद ३१४ (मयंक अगरवाल ८६, बाबा अपराजित ५६, मनीष पांडे ५५; धवल कुलकर्णी ३/६४) पराभूत वि. पश्चिम विभाग :  ४७.१ षटकांत ८ बाद ३१९ (सूर्यकुमार यादव ८०, अक्षर पटेल नाबाद ६४; स्टुअर्ट बिन्नी ३/६६).
मी फलंदाजीही करू शकतो हे सिद्ध केले – अक्षर पटेल
मुंबई : मी फक्त गोलंदाजीच करू शकतो, असे काही जणांना वाटते. पण मी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाण्यापूर्वी सलामीला खेळायचो, पण त्यानंतर मात्र मी गोलंदाजीवर भर दिला. या खेळीने मी चांगली फलंदाजीही करू शकतो, हे सिद्ध झाले आहे. या खेळीचा मला आनंद नक्कीच आहे, पण माझी खेळी संघाच्या विजयात महत्त्वाची ठरली याचा जास्त आनंद आहे, असे सामन्यानंतर अक्षर पटेलने सांगितले.