ब्रिस्बेन आणि अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या दोन अ‍ॅशेस कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडला मानहानीकारक पराभव स्वीकारायला लागला. त्यामुळे इंग्लंडला मालिका वाचवण्याची तिसऱ्या कसोटीत अखेरची संधी असेल. शुक्रवारपासून ‘वाका’च्या खेळपट्टीवर सुरू होणारा हा सामना गमावल्यास इंग्लंडला मालिका गमवावी लागेल, तर दुसरीकडे विजयाची हॅट्ट्रिक साजरी करत यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ अ‍ॅशेस नाव कोरेल.  अ‍ॅलिस्टर कुक आणि मायकेल क्लार्क या दोघांचाही हा शतकपूर्ती सामना असून कोणत्या कर्णधाराला संघ विजयाची भेट देणार, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघाबाबत बोलायचे झाल्यास गोलंदाजीमध्ये मिचेल जॉन्सन हा भन्नाट फॉर्मात आहे. गेल्या दोन्ही सामन्यांत त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना भेदक आणि अचूक माऱ्यापुढे लोटांगण घालण्यास भाग पाडले आहे. जॉन्सनला या वेळी पीटर सिडल आणि रायन हॅरिस यांची चांगली साथ मिळत आहे, तर फलंदाजीमध्ये कर्णधार क्लार्क, डेव्हिड वॉर्नर आणि बॅड्र हॅडिन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
इंग्लंडचा संघही चांगलाच समतोल वाटत असला तरी दोन पराभवांनी झालेले मानसिक खच्चीकरण, ही त्यांच्यापुढे मोठी समस्या असेल. गोलंदाजीमध्ये स्टुअर्ट ब्रॉड चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळताना दिसत नाही. जेम्स अँडरसनला अजूनही आपला प्रभाव पाडता आलेला नाही. एकाही फलंदाजाला अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आपल्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून ऑस्ट्रेलियाला धूळ चारण्याच्या निर्धाराने इंग्लंडचा संघ मैदानात उतरला तरच ते मालिकेत पुनरागमन करू शकतील.