इंग्लडचा कर्णधार अॅलिस्टर कुकने कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी वयात १० हजार धावा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. सोमवारी श्रीलंकेविरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सोमवारी त्याने हा विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाबरोबरच कुकने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्डदेखील तोडले आहे. कसोटीमध्ये १० हजार धावा बनविणारा कुक हा जागातील १२ वा तर इंग्लडचा पहिला फलंदाज ठरला आहे. श्रीलंकेविरुध्दच्या डरहम कसोटी सामन्यादरम्यान डावाच्या दुसऱ्याच षटकात नुवान प्रदीपच्या चेंडूवर चौकार मारून त्याने हे यश संपादन केले. कसोटी क्रिकेटमधील सचीन तेंडुलकरचा सर्वात कमी वयात १० हजार धावा रचण्याचा रेकॉर्ड कुकने आपल्या नावावर केला असला तरी डावांच्या बाबतीत तो मागेच आहे. कसोटी सामन्यादरम्यान सर्वात कमी डाव खेळून १० हजार धावा रचण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि कुमार संगकाराच्या नावावर आहे. तिघांनी १९५ डावांत हे यश प्राप्त केले होते. कुकला १0 हजार धावा पूर्ण करण्यासाठी २२९ वा डाव खेळावा लागला.

सर्वात कमी वयात कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे फलंदाज

खेळाडू                                       वय
अॅलिस्टर कुक                ३१ वर्ष ५ महीने ५ दिवस
सचिन तेंडुलकर             ३२ वर्ष १० महीने २० दिवस
जॅक कॅलिस                   ३३ वर्ष ४ महीने ११ दिवस
रिकी पॉटिंग                  ३३ वर्ष ५ महीने ११ दिवस
माहेला जयवर्धने           ३४ वर्ष ६ महीने २९ दिवस