आदिवासी जिल्हा आणि शिरीष कुमार या स्वातंत्र्यसैनिकाच्या बलिदानासाठी ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये सध्या खो-खोचा थरार रंगत आहे. यशवंत विद्यालयाच्या विस्तीर्ण पटांगणावर सुरू असलेल्या भाई नेरूरकर चषक अखिल भारतीय आमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेतील लढतींमध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरने आगेकूच केली आहे.
महिलांमध्ये मुंबई उपनगरने मुंबईवर १८-७ अशी ११ गुणांनी मात केली. उपनगरतर्फे आरती कदमने १.५० आणि ३.३० मिनिटे संरक्षण करताना २ गडी बाद केले. श्रुती सकपाळने २ मिनिटे आणि ३.१० मिनिटे नाबाद संरक्षण केले. शिल्पा जाधव आणि मयुरी पेडणेकरने प्रत्येकी सहा गडी बाद केले. ठाण्याने कोल्हापूरचा एक डाव आणि ५ गुणांनी पराभव केला. प्रिया पाटीलने ३.२० मिनिटे संरक्षण केले आणि २ गडी बाद केले. मृणाल कांबळेने २.३० संरक्षण करताना १ गडी बाद केला.
पुरुष गटाच्या अटीतटीच्या लढतीत मुंबईने मुंबई उपनगरचा अवघ्या एका गुणाने पराभव केला. मुंबईतर्फे कुशाल शिंदेने १.४०, २.१० मिनिटे संरक्षण करताना २ गडी बाद करत विजयात निर्णायक भूमिका बजावली. निकेत राऊतने १.४० संरक्षण करताना ३ गडी बाद केले. याचप्रमाणे मुंबई उपनगरने अमरावतीवर एक डाव आणि एका गुणाने विजय मिळवला. प्रणय राऊळने ३ मिनिटे संरक्षण करताना २ गडी बाद केले तर दीपक माधवने १.३० मिनिटे संरक्षण करताना १ गडी बाद केला.
शुक्रवारी झालेल्या लढतीनंतर पुरुष गटातून सांगली, उस्मानाबाद, मुंबई, मुंबई उपनगर, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे आणि ठाणे संघांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. महिलांमध्ये मुंबई, मुंबई उपनगर, सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, पुणे आणि ठाणे यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. किशोर गटात ठाणे, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर संघांनी उपांत्य फेरीत आगेकूच केली तर किशोरी गटात पुणे, ठाणे, अहमदनगर आणि सांगली संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.